मालेगाव : तालुक्यातील डोंगराळे येथील टोल नाका कार्यालयात असलेली महापुरुषाची प्रतिमा काढण्याचा निर्णय महाव्यवस्थापकाने घेतल्याने स्थानिकांनी गुरुवारी टोल नाका प्रशासनाविरोधात आंदोलन केले.
मालेगाव – कुसुंबा मार्गावर डोंगराळे शिवारात नरसी शिवा गणेश या मक्तेदाराचा टोल नाका आहे. परिसरातील २५ कर्मचारी या टोल नाक्यावर कार्यरत आहेत. या स्थानिक कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कार्यालयातील स्वागत कक्षाच्या भिंतीवर महापुरुषाशी संबंधित प्रतिमा लावली आहे. गुरुवारी सकाळी मक्तेदार कंपनीच्या महाव्यवस्थापकाने भ्रमणध्वनी करुन स्थानिक व्यवस्थापकाला संबंधित प्रतिमा काढण्यास सांगितले. हे समजल्यावर कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. कुठल्याही परिस्थितीत प्रतिमा न काढण्याची भूमिका त्यांनी घेतली.
डोंगराळे गावातील नागरिकांनी टोल नाक्यावर धाव घेतली. त्यांनी टोल बंद आंदोलन सुरू केले. आंदोलनामुळे अनेक वाहने टोल वसुली न करता सोडण्यात आली. महाव्यवस्थापकाने घटनास्थळी यावे, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असा आग्रह आंदोलकांनी धरला. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. या आंदोलनात बंटी ह्याळीज, पप्पू खैरनार, शंकर खैरनार, सुधीर ह्याळीज, बापू भदाणे यांसह इतर गावकरी सामील झाले. दरम्यान, संबंधित महाव्यवस्थापकाकडून स्थानिक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, धमकी देणे, त्यांना अवमानित करणे असे प्रकार याआधीही घडले असल्याचे डोंगराळेच्या सरपंच निलाबाई ह्याळीज, उपसरपंच बारकू म्हसदे यांनी लक्षात आणून दिले.