जळगाव – यावल तालुक्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून, वाळूमाफियाकडून साकळीच्या मंडळ अधिकार्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि हल्ल्यातील संशयिताला अटक करावी, या मागणीसाठी यावल येथील तालुका तलाठी संघ आणि महसूल कर्मचारी संघटना यांच्यातर्फे यावल येथील तहसील कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. संशयिताला अटक न झाल्यास फैजपूर येथील प्रांताधिकारी व तहसीलदारांना सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील साकळी येथील मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्यावर वाळूमाफियाने ठार मारण्याच्या उद्देशाने भ्याड हल्ला केला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वाळूमाफियाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. परंतु, संशयिताला अटक न झाल्याने यावल पोलिसांवर दडपण आले आहे का, असा प्रश्न तालुक्यात उपस्थित केला जात आहे.
संशयिताला अटक होत नाही, तोपर्यंत यावल तालुका तलाठी संघ व महसूल कर्मचारी संघटनेतर्फे कामबंद व सामूहिक रजा टाकून आंदोलन करणार असल्याचा इशारा फैजपूर येथील प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्यासह यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.