मालेगाव तालुक्यातील बोरी-आंबेदरी धरणातून शेती सिंचनासाठी बंदिस्त कालवाद्वारे पाणी देण्यात येणार असून या कामास सुरुवात झाली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे प्रशासन गरीब शेतकऱ्यांची दखल घ्यायला तयार नाही. या कालव्यासाठी पालकमंत्र्यांकडून राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. असा आरोप या कालव्यास विरोध असलेल्या ग्रामस्थांनी केला आहे.
हेही वाचा- नाशिकमध्ये हुडहुडी, पारा ९.२ अंशावर
मालेगाव तालुक्यातील बोरी-आंबेदरी धरणाच्या लाभक्षेत्रात दहिदी, वनपट, टिंगरी, राजमाने, अस्ताने, लखाने या गावातील शेती येते. तसेच झोडगे येथील गाव तळे उर्वरित पाण्याने भरून दिले जात होते. धरणाच्या लाभक्षेत्रात भिलकोट, कांधने, गुगुळवाड, पळसदरे वगैरे गावे येत नाहीत. धरणात गाळाचे प्रमाण बरेच आहे. कालवा निर्मितीपासून त्याची कधीच दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे थोडीफार गळती होणे स्वाभाविक आहे. त्यावर कालवा बंदिस्त करणे हा उपाय नसून दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून कालवा बंदिस्त करण्याची मागणी नसताना सदर प्रकल्प राबवला जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
हेही वाचा- नाशकातील गोदावरी नदीवर दररोज निनादणार महाआरतीचे सूर, पाच कोटींचा निधी मंजूर
ग्रामस्थ भूषण कचवे यांनी यासंदर्भात आपले म्हणणे मांडले. या प्रकल्पाने आमच्या भागातील शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे. माळरानावरील जमीन पाण्याशिवाय कोरडवाहू होतील. आम्हाला उत्पन्नाचे शेतीशिवाय कोणतेही दुसरे साधन नाही. हे पाणी जर जलवाहिनीद्वारे गेले तर आमच्या जमिनीत पाणी मुरणार नाही. आमच्या विहिरी कोरड्या पडतील. त्यामुळे भुसे यांनी आमच्या भावना लक्षात घेऊन तत्काळ प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. बोरी- आंबेदरीचे पाणी हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. प्रशासनाकडून जबरदस्ती झाल्यास पालकमंत्री भुसे यांच्या कार्यालयात त्यांच्या समक्ष आत्मदहन करण्यात येईल, असा इशाराही कचवे यांनी दिला.