लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगाव: रविवारी मोसम पूल येथील चौकात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या अलोक जयस्वाल (१२) या शाळकरी मुलाचे रुग्णालयात निधन झाले. शहरात सध्या सुरू असलेल्या मोसम पूल आणि अन्य रस्ते कामांप्रसंगी वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्यानेच या विद्यार्थ्याचा बळी गेल्याचा आरोप करीत विविध संघटनांनी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केले. या प्रसंगी नाकर्तेपणाचा ठपका ठेवत आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध नोंदविला.

रविवारी दुपारी अलोक हा काका पिंटू यादव यांच्यासह दुचाकीने शहराच्या संगमेश्वरातील दवाखान्यात उपचारासाठी जात होता. सोबत अलोकची आईही होती. तिघे मोसम पूल चौकातून दुचाकीने जात असताना पाठीमागून येणाऱ्या टँकरची धडक बसली. त्यात अलोक आणि त्याची आई दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी अलोकचे निधन झाले.

हेही वाचा… नाशिक : फवारणी औषधामुळे शेतकऱ्याचा मृत्यू

शहरात महापालिकतर्फे ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. तसेच नवीन बस स्थानकाकडे जाणारा मोसम नदीवरील एक जूना पूल पाडून तेथे पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामांमुळे शहरात जागोजागी वाहतुकीची कोंडी होत आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर सुरू असलेल्या कामांच्या निमित्ताने महापालिका, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे योग्य नियोजन करणे आवश्यक होते, त्यासाठी अवजड वाहनांना शहरातून प्रवेश बंदी करावयास हवी होती. मात्र तसे न झाल्याने शहरातून वाहने चालविताना दुचाकीस्वारांना तसेच पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. याशिवाय अनेकदा महत्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस नसतात, अशी तक्रार आंदोलकांनी केली.