लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : परभणी जिल्ह्यात संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या दोषींना ताब्यात घ्यावे, सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्युस जबाबदार पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, डॉ. आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानाबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, यासाठी ‘आम्ही संविधानवादी’ संघटना आणि आंबेडकरी समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जोरदार घोषणाबाजीत मोर्चाला सुरुवात झाली. अमित शहा यांच्याविरुध्दही घोषणाबाजी करण्यात येत होती. आंदोलकांनी सीबीएस सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आंदोलकांच्या हातात डॉ. आंबेडकर यांच्यासह शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा असलेले फलक होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थोडावेळ ठिय्या दिल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना मागण्यांचे निवेदन दिले.

आणखी वाचा-मालेगावात शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थी अन् शिक्षकांची ‘शाळा’

दोषींवर त्वरीत कारवाई न केल्यास संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. मोर्चामुळे सीबीएस तसेच मेहर सिग्नल या भागात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलनात संदीप डोळस, बिपीन कटारे, दीपक डोके, मलिक काळे, दामोदर पगारे, कविता पवार आदींसह आंबेडकर आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

शालिमार रस्ता तात्पुरता बंद

मोर्चामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी सीबीएस ते शालिमार दरम्यानचा रस्ता दुतर्फा काही वेळ बंद ठेवला होता. वाहतूक महाकवी कालिदास कलामंदिरमार्गे वळविण्यात आली होती. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest for parbhani incident slogans against amit shah mrj