मारहाण करणाऱ्यांपासून संरक्षण देण्याची मागणी

अतिशय अरुंद मार्गावरून सुरक्षित वाहतुकीची कसरत, त्यात कोणत्याही वाहनाला धक्का लागला तर संबंधितांकडून होणारी शिवीगाळ व मारहाण, बस थांब्यांवर रिक्षाचालकांचे अतिक्रमण आणि दादागिरी, अर्निबध रिक्षांमुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बस पकडण्यासाठी करावी लागणारी धावपळ.. शहर बस वाहतुकीची धुरा सांभाळणाऱ्या सुमारे एक हजार चालक-वाहकांना दररोज या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याचे चित्र आहे. बसमध्ये पासवरून झालेल्या वादातून टोळक्याने एसटीच्या पंचवटी डेपोत शिरून दोघांवर प्राणघातक हल्ला चढविला. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे शहरात काम करणे दिवसागणिक अवघड होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय करावा आणि बसचालक-वाहकांना संरक्षण द्यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चात शेकडो वाहक व चालक सहभागी झाल्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी दोन या कालावधीत बससेवा विस्कळीत झाली.
दरम्यान, पंचवटी डेपोत मारहाण करणाऱ्या सहा संशयितांना पोलिसांनी अटक केल्यामुळे बस सेवा बंद ठेवण्याचे आंदोलन मागे घेण्यात आले.
एसटी महामंडळामार्फत चालविली जाणारी शहर बस वाहतूक वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने चर्चेत असते. मध्यवर्ती भागातील अरुंद रस्त्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या बसगाडय़ा पाहिल्यावर चालकांना नेमकी काय कसरत करावी लागते ते लक्षात येते.
सुरक्षित वाहतुकीचा निकष पाळण्याचा प्रयत्न संबंधितांकडून होत असला, तरी मार्गक्रमण करताना काय होईल याचा नेम नसतो. कोणाला कट बसला अथवा वाहनाला धक्का लागला तर वाहनधारक लगेच मारायला धावतात, असा एसटीचालकांचा सार्वत्रिक अनुभव आहे. महिन्याकाठी पोलीस ठाण्यात या स्वरूपाच्या चार ते पाच तक्रारी दाखल होतात, असे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सवलतीच्या पासच्या मुद्दय़ावरून बसमध्ये विद्यार्थी व वाहक यांच्यात झालेल्या बेबनावाचे रूपांतर सोमवारी रात्री डेपोतील दोन कर्मचाऱ्यांवर हल्ल्यात झाले.
एका टोळक्याने चढविलेल्या हल्ल्यात पंचवटी डेपोतील सुरक्षारक्षक एच. एस. गाढवे आणि चालक एन. के. जाधव हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती समजल्यानंतर एसटी कर्मचारी संतप्त झाले.
या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी बस रस्त्यावर न आणण्याचा निर्धार संघटनेने केला. या घटनेची दखल घेत पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. त्यात वाघाडी येथील रोहित कडाळे, सचिन गायकवाड, नितीन मोरे, अविनाश कोलकर, मोहन गायकवाड, हितेश व उमेश यांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयितांना अटक झाल्यामुळे वाहक-चालकांनी बससेवा बंद करू नये असा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला. त्यास संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे पहाटे नियमितपणे बसगाडय़ा सुरू झाल्या. मात्र सकाळी अकरा वाजता पंचवटी पोलीस ठाण्यावर मोर्चाचे नियोजन असल्याने त्या काळात काही भागातील बससेवा विस्कळीत झाली.
नाशिकरोड, शालिमार, रविवार कारंजा, मध्यवर्ती बसस्थानक, सातपूर या थांब्यांवर दररोज रिक्षाचालकांच्या दादागिरीला तोंड द्यावे लागते. एसटीच्या थांब्यावर रिक्षाचालक कब्जा करतात. त्यामुळे बस थांब्याच्या मागे-पुढे उभी करावी लागते. ती पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होऊन अपघात घडल्याची उदाहरणे असल्याचे अधिकारी सांगतात. अरुंद रस्त्यावरून बस चालविताना दुचाकी वा चारचाकी वाहनधारकांना कट बसल्यास तेदेखील थेट मारहाण करतात. अलीकडच्या काळात या प्रकारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
रिक्षाचालकांच्या दादागिरीचा मुद्दा वारंवार पोलीस यंत्रणेसमोर मांडूनही दखल घेतली जात नाही. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस थांब्यावरून प्रवासी पळवून नेतात. या एकंदर स्थितीमुळे काम करणे धोकादायक झाल्याकडे वाहक-चालकांनी लक्ष वेधले.

Story img Loader