लोकसत्ता वार्ताहर
मालेगाव : करारातील अटी, शर्तींप्रमाणे वीज वितरण सेवा पुरविण्यात असमर्थ ठरलेल्या आणि मनमानी कारभार तसेच कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे वादग्रस्त ठरलेल्या मालेगाव पॉवर सप्लाय या खासगी वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात शहरात मंगळवारी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. ‘कंपनी हटाव मालेगाव बचाव’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.
पाच वर्षांपासून शहरातील वीज वितरणाचा ठेका मालेगाव पॉवर सप्लाय या खासगी कंपनीकडे देण्यात आला आहे. सुरुवातीपासूनच या कंपनीचा कारभार वादग्रस्त ठरला आहे. विहित मुदतीत वीज जोडण्या न देणे, ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज देयकांची आकारणी करणे, त्या संदर्भातील तक्रारींचे योग्य निरसन न करणे, वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, विद्युत पुरवठा खंडित होण्यासंदर्भात पूर्वकल्पना ग्राहकांना न देणे,ऑनलाइन सेवा मागणी वा सर्वसाधारण तक्रारींची योग्य दखल न घेणे अशा स्वरूपातील कंपनीच्या कारभारामुळे वीज ग्राहक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. याबद्दल तक्रार करुनही कंपनीच्या कारभारात सुधारणा होत नाही. कंपनीची बेपर्वाई वाढत असल्याची ओरड ग्राहकांकडून केली जात आहे.
आणखी वाचा-नंदुरबार : बकरी ईदसाठी जात असताना अपघातात दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी
कंपनीच्या एकूणच कारभारामुळे शहरातील वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून त्यामुळे शहरात कंपनीविरोधात रोष निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कंपनीचा ठेका रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कंपनीच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी विविध वक्त्यांनी कंपनीच्या मनमानी कारभारावर सडकून टीका केली. शहरातील वीज वितरण कामाचा ठेका देताना महावितरण कंपनीकडून एक करार करण्यात आला आहे. या करारातील अटी शर्तींचे कंपनीकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अटी शर्तींचे उल्लंघन झाल्याने वीज वितरण कंपनीचा देण्यात आलेला खासगी ठेका रद्द करून संबंधित कंपनीच्या त्रासातून मालेगावकरांची मुक्तता करावी, असा आग्रह आंदोलकांनी धरला.
आणखी वाचा-सिक्कीममध्ये नाशिकचे पर्यटक सुखरुप
आंदोलनात माजी आमदार आसिफ शेख, बंडू बच्छाव, सुनील गायकवाड, रामा मिस्तरी, जितेंद्र देसले, प्रमोद शुक्ला, दिनेश ठाकरे, राजाराम जाधव, भारत म्हसदे, गुलाब पगारे, दिनेश पाटील आदी सामील झाले होते. यावेळी आंदोलकांच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले.