मालेगाव : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मालेगावातील हिंदू-मुस्लिम नागरिकांनी गुरुवारी सामूहिकपणे निषेध नोंदवला. शहरात कडकडीत बंद पाळला. यानिमित्ताने संतप्त नागरिकांनी मोर्चा काढून, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन तर, कुठे पुतळ्याला चपलांचा मार देत घोषणाबाजी केली.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ काही संघटनांकडून मालेगाव बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी उशिरा घेण्यात आला होता. त्यानुसार समाज माध्यमांद्वारे लोकांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील कॅम्प, सटाणा नाका, मोसम पूल, कॅम्प रोड, संगमेश्वर, किदवाई रोड, भाजी बाजार, गुळ बाजार, सराफ बाजार आदी भागातील दुकानदारांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले.

शहरातील शनी मंदिर चौकापासून दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा घेऊन मोर्चा काढण्यात आला. जामे मज्जिद आणि गणपती मंदिरासमोर या पुतळ्याचे दहन करण्यात आले. अतिरेकांचा बिमोड करण्यासाठी भारत सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात, पाकिस्तानात जाऊन अतिरेक्यांचे तळे उद्ध्वस्त करावीत, अशी मागणी यावेळी अनेकांनी केली.

सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सचिव मौलाना रहेमानी, आम्ही मालेगावकर संघटनेचे निमंत्रक निखिल पवार, रिजवान बॅटरीवाला, हरीदादा निकम, इमरान इंजिनियर, भरत पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेतर्फे पाकिस्तानच्या निषेधार्थ मोसम पूल चौकात घोषणाबाजी करुन निदर्शने करण्यात आली. या ठिकाणी निदर्शकांनी प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा मार दिला. यानंतर संघटनेतर्फे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादीतर्फेही (शरद पवार) पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. बुधवारी रात्री येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ पक्ष कार्यकर्त्यांनी मेणबत्ती मोर्चा काढून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र भोसले, तालुका अध्यक्ष संदीप पवार, शहराध्यक्ष सलीम रिजवी, दिनेश ठाकरे,शेखर पवार आदी उपस्थित होते.