नाशिक – जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी रात्री उशीरा महिला विभागात काम करणाऱ्या परिचारिकेवर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी रुग्णालयाच्या आवारात परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ काम विस्कळीत झाले. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची भेट घेत काम करतांना सुरक्षेची मागणी केली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात एक महिला आपल्या मुलीला उपचारासाठी घेऊन आली. त्या ठिकाणीच महिलेची तब्येत बिघडल्याने तिच्यावर महिला विभागात उपचार सुरू होते. मंगळवारी सायंकाळी उशीरा या महिलेचा तिचा पती डबा घेऊन आला. त्यावेळी सफाई कर्मचाऱ्यांचे काम सुरू होते. त्यांनी संबंधितास बाहेर जाण्यास सांगितले. याचा त्या महिलेला राग आला. ज्या परिचारिकेने तिच्या पतीला बाहेर काढले, त्या परिचारिकेला मारहाण केली. काहींनी परिचारिकेला सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशीरा सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा >>> नाशिक मनपातील प्रशासकीय राजवटीबद्दल भाजपामध्ये दोन गट; एक समाधानी तर, दुसऱ्याची नाराजी
जिल्हा शासकीय रुग्णालयात वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे काम करणे शक्य नसल्याने बुधवारी सकाळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले. कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली. दिवसरात्र परिचारिका रुग्णांची सेवा करतात. कर्मचारी साफसफाई करत असतात. परंतु, त्यांचे संरक्षण कोण करणार, असा प्रश्न यावेळी करण्यात आला. न्याय आणि संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत काम बंदचा इशारा देण्यात आला. यावेळी परिचारिकांच्या प्रतिनिधींनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेतली. त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात ३०० हून अधिक परिचारिका नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात ३०० हून अधिक परिचारिका आहेत. रुग्णालयात कर्मचाऱ्यांसाठी ३० हून अधिक सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. करोनापूर्व काळात परिचारिकांसाठी बंदूकधारी सुरक्षारक्षक होते. मात्र करोना काळात ही सुरक्षा काढून घेण्यात आली. गेल्या काही दिवसात परिचारिका तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढले आहेत. याविषयी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत असतांना ३० सुरक्षा रक्षकांचे नियोजन कसे करता येईल, याविषयी दिवसभर चर्चा सुरू राहिली. जिल्हा शल्य चिकित्सकांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेतली.