धुळे : महापुरुषांसह संतांचा अवमान करणार्या संभाजी भिडेंना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी माळी समाज, ओबीसी आरक्षण बचाव समिती, ठाकरे गट, समतावादी पुरोगामी संघटना यांच्या वतीने सोमवारी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. क्यूमाईन क्लब रोडवर झालेल्या या आंदोलनात दिलीप देवरे, देवेंद्र पाटील, बी. एन. बिरारी, प्रा. शरद पाटील, महेश मिस्तरी, अशपाक शेख, नितीन माळी, पोपटराव चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. याबाबत दिलेल्या निवेदनात आंदोलकांनी भूमिका मांडली आहे.
महात्मा फुले, महात्मा गांधी, राजा राममोहन रॉय, शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दल मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या व्यक्तीने अपशब्द वापरले. त्यामुळे गांधी, फुले अनुयायांच्या आणि समर्थकांच्या भावना दुखावल्या आहेत. भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांना अटक झालेली नाही. राज्यातील सरकार भिडे यांना पाठीशी घालत आहे. त्यांना अटक करण्यास टाळाटाळ करीत आहे. भिडेंना तत्काळ अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.