लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाला वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने मंगळवारी शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी डोक्यावर खोके घेऊन आंदोलन केले. यावेळी विविध प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या.

राष्ट्रवादीने शहरात गद्दार दिन साजरा करत खोक्याच्या प्रतिकृती हातात घेऊन ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन केले. यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, योगिता आहेर, संजय खैरनार, विष्णुपंत म्हैसधुणे, गौरव गोवर्धने, समीना मेमन उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी याच दिवशी बंड केल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी गद्दार दिन साजरा करण्यात आला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गद्दारी केली, असा आरोप संपूर्ण महाराष्ट्रातील गावागावात होत आहे. त्याचा आधार घेत राष्ट्रवादीने गद्दार दिन साजरा करण्यात आल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… नाशिक: पर्यटकांसमोर नृत्यासाठी आदिवासी मुलींवर बळजोरी; खासगी वसतिगृहाविरुध्द गुन्हा

दरम्यान, देवळा येथेही राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सध्या कांद्यासह कोणत्याही शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही, तसेच बेरोजगारी, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गलथान कारभार करणाऱ्या सत्ताधारी गद्दार नेत्यांच्या कारभारावर जनता नाराज असून त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन झाले. देवळा बस स्थानकापासून ते पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून खोके दाखवून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांना निवेदन देण्यात आले.

Story img Loader