धुळे – शासकीय धान्य गोदाम, शासकीय वखार महामंडळ तसेच धुळे-नंदुरबार जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ या ठिकाणच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करावी, बाहेरच्या कामगारांना काम देऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी कामगारांनी येथे निदर्शने केली.
शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात भूमिका मांडली आहे. शासकीय धान्य गोदामातील काम हे आतापर्यंत माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांनीच केलेले आहे. शासनाच्या नवीन कायद्यानुसार शासकीय धान्य पुरवठा थेट रेशन दुकानदारापर्यंत पोच करावा लागणार असून बाहेरील कामगारांना हे काम न देता द्वारपोचचे काम माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांनाच मिळाले पाहिजे, शासकीय वखार महामंडळातील कामही माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांनाच मिळाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> धुळ्यात लुटमार करणाऱ्या दोघांना अटक
शासकीय वखार महामंडळाचे काम वाहतूक ठेकेदाराला मिळाले आहे. ठेकेदार हे काम बाहेरील कामगारांकडून करुन घेत आहे. साक्री, पिंपळनेर येथे माथाडी कायदा लागू नसल्यामुळे व्यापाऱ्यांची मनमानी सुरु आहे. नविन कर्मचारी भरतीत हमाल मापाडी महिला कामगारांच्या मुलांना तसेच मुलींना प्राधान्य द्यावे, मोराणे येथील प्रताप नाना महाले कांदा खरेदी विक्री केंद्रात माथाडी मंडळातील नोंदीत हमाल मापाडी महिला कामगारांना काम मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष हेमंत मदाने, अध्यक्ष गंगाधर कोळेकर, सचिव भागवत चितळकर, महिला कामगार मंडळच्या अध्यक्षा गायत्री साळवे, सहचिटणीस लताबाई सूर्यवंशी यांची स्वाक्षरी आहे.