नाशिक : आदिवासी दिन तसेच क्रांती दिनाचे औचित्य साधत शहरात विविध संघटना, राजकीय पक्षांच्या वतीने केंद्र सरकाराविरोधात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस आणि बिरसा ब्रिगेडच्या वतीने मणिपूरमधील आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बिरसा ब्रिगेड आणि काँग्रेस महिला आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही सहभागी झाले होते. मणिपूर सरकार ठोस कारवाई करीत नसल्याने आदिवासी समाज गाव सोडून जात आहे. मणिपूर राज्य तसेच केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध करीत आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, आदिवासी जनतेच्या जमिनी बिगर आदिवासी जनतेला हस्तांतरीत करण्यास प्रतिबंध घालण्यात यावा, सटाणा येथील आंदोलनादरम्यान अटक झालेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.
आम्ही भारताचे लोक, आयटक यांच्या वतीने गोल्फ क्लब मैदानापासून केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. वाढती बेरोजगारी, सार्वजनिक सेवांचे खासगीकरण, कामगार कायद्यावर हल्ला, सरकारचा कल्याणकारी लाभाऐवजी प्रसिध्दीचा सोस यावर टीका करण्यात आली. सध्या छोटे उद्योग व्यवसाय संकटात आले असतांना सरकारचे धोरण हे भांडवलदार धार्जिणे आहे. शिक्षणाचे खासगीकरण होत आहे. मणिपूरमधील परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे उद्योग बाहेर जात आहेत. यासह अन्य काही मुद्यांकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी राजु देसले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मोर्चांमुळे वाहतूक कोंडी
नाशिक शहर काँग्रेस, आयटक तसेच आदिवासी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चांमुळे वाहतूकीचे नियोजन पूर्णत: कोलमडले. त्र्यंबक नाका, महात्मा गांधी रस्ता, शालिमार परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या काळात शाळा -महाविद्यालये सुटल्यावर विद्यार्थ्यांना बस मिळवितांना अडचणी आल्या. दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना मार्गस्थ होतांना अडचणी आल्या. वाहनचालकांना पर्यायी मार्ग स्विकारत मार्गस्थ व्हावे लागले.