जळगाव : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमिवर आठवडाभर पतंगबाजी सुरू राहणार असल्याने यादरम्यान नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी जखमी होऊ शकतात. त्यामुळे वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे शहरासह जिल्ह्यात सात ते २१ जानेवारी या कालावधीत जनप्रबोधन मोहीम राबविण्यात येत आहे.
हेही वाचा >>> काच असलेला मांजा नका वापरू, जखमी करू नका पाखरू
नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांसह मानवास दुखापतीचे प्रकार घडतात. काहींना तर जीवही गमवावा लागतो. वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे मांजात अडकलेल्या पक्ष्यांना जीवदान देऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाते. जखमी पक्षी पशुवैद्यकीय केंद्रात उपचार करून वनविभागाच्या ताब्यात दिले जातात. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गाल्फाडे, रवींद्र सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोहिमेत सहभागी आहेत. कुणालाही जखमी पक्षी आढळून आल्यास वन्यजीव संरक्षण संस्था किंवा वनविभागाच्या १९२६ या मदतवाहिनीवर संपर्क साधावा, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांनी केले आहे.
हेही वाचा >>> जळगाव : गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ग्रामसंवाद सायकल यात्रा
दरम्यान, जळगाव शहरात महाबळ, हरिविठ्ठलनगर, आशाबाबानगर, रामानंदनगर, मेहरुण, पिंप्राळा, हुडको या भागात जनप्रबोधन मोहीम राबविण्यात आली. पुढील आठवड्यात धरणगाव, भुसावळ, चोपडा, जामनेर व इतर तालुक्यांत जनजागृती करण्यात येणार आहे, असे जगदीश बैरागी यांनी सांगितले. एरंडोल येथेही मोहीम राबविण्यात आली. संस्थेच्या पदाधिकार्यांनी चौकाचौकात जात, प्रत्येक पतंग विक्रेत्यांकडे जात नायलॉन मांजाविषयी प्रबोधन केले. मुलांकडून मांजा जमा केला. त्यांना खाऊसाठी संस्थेकडून बक्षीस देण्यात आले. नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे बाळकृष्ण देवरे यांनी सांगितले.