नंदुरबार – जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटात बुधवारी सकाळी नवापूर- पुणे बसची मालमोटारीला मागून धडक बसल्याने १० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या दहिवेल आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग मृत्युचा सापळा झाला असून दररोज लहानमोठे अपघात या महामार्गावर होत आहेत. बुधवारी सकाळी साडे दहा वाजता नवापूर आगारातून पुण्यासाठी निघालेली बस साडे अकराच्या सुमारास कोंडाईबारी घाटात आली असता पुढे चालणाऱ्या मालमोटारीला बस मागून धडकली. या अपघातात बसच्या चालक कक्षाचे अधिक नुकसान झाले.
या अपघातात बसमधील १० प्रवासी जखमी झाले असून जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी जखमींना दहिवेल आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. संथपणे सुरु असलेले महामार्ग चौपदरीकरणाचे काम अपघातांसाठी कारण ठरत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हे काम त्वरीत पूर्ण करण्याची आवश्यकता मांडण्यात येत आहे.