मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथे आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन काव्य स्पर्धेत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत २०२५ च्या कर्मवीर काव्य करंडकावर नाव कोरले. निमगाव येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुरस्कृत ही स्पर्धा दरवर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केली जाते. यंदा पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, बारामती, जळगाव, धुळे, संभाजीनगर, मुंबई, पनवेल, नागपूर आदी परिक्षेत्रातील ६५ महाविद्यालयीन संघानी सहभाग नोंदवला होता. कनिष्ठ आणि वरिष्ठ गट अशा दोन स्तरावर ही स्पर्धा झाली. त्यात पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी उत्तम कामगिरी करत चषक जिंकला. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या भाग्यलक्ष्मी क्षीरसागरने वरिष्ठ गटात वैयक्तिक २१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. द्वितीय क्रमांकाचे १५ हजार रुपयाचे बक्षीस पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या अविनाश काठवटे याने तर तृतीय क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे पारितोषिक छत्रपती संभाजीनगरच्या विधी महाविद्यालयातील सृष्टी लोखंडे हिने पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कनिष्ठ गटात नामपूर महाविद्यालयाची दुर्गा फटांगडे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस आर. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुक्रमे कावेरी मदने आणि मानसी निकम या विद्यार्थिनींनी मिळवले. कवी नारायण पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. संस्थेचे समन्वयक अपूर्व हिरे हे अध्यक्षस्थानी होते. स्पर्धेसाठी डॉ. योगिता पाटील, कवी अमोल चिने, कवी राहुल उशिरे हे परीक्षक म्हणून लाभले. स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उज्जैन कदम, उपप्राचार्य प्रा. के. के. बच्छाव,पर्यवेक्षक प्रा. यू. के. कुडासे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. गणेश बारगजे यांनी केले.