नाशिक – त्र्यंबकेश्वर मंंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याच्या प्रकाराची अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमून चौकशीस सुरुवात झाली असताना बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिर शुद्धिकरण करून आरती केली.
त्र्यंबकेश्वर मंदिरात शनिवारी रात्री जबरदस्तीने दुसऱ्या समाजातील लोकांनी संदल मिरवणुकीनिमित्त प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला तेथील सुरक्षारक्षकांसह ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. रविवारी पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीत दोन्ही गटांची समजूत काढत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, नंतर या प्रकारास राजकीय वळण मिळाले.
हेही वाचा – नाशिक : मांजरीने कोंबडीची पिले खाल्ली म्हणून आजोबाला मारहाण
बुधवारी सकाळी हिंदू महासभा, ब्राह्मण महासंघ, नाशिक पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ यासह वेगवेगळ्या हिंदू संघटनांचे प्रतिनिधी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले. त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरून गुलाब पाणी, गोमुत्राचा वापर करून शुद्धिकरण केले. यावेळी हर हर महादेव असा जयघोष करण्यात आला. अनेकांनी भगवे वस्त्र, भगव्या टोप्या घालून हिंदू धर्म की जय यासह इतर घोषणा दिल्या. मंदिर शुद्धिकरणाच्या पूजेनंतर महाआरती करण्यात आली. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता.