मनमाड – पुष्पक एक्स्प्रेस बुधवारी दुपारी जळगावहून निघाल्यानंतर पाचोरा परिसरातील परधाडे स्थानकालगत चालकाने अकस्मात ब्रेक दाबला. घर्षण होऊन चाकातून ठिणग्या उडाल्या. एका प्रवाशाने घाबरून आग लागल्याचा आरडाओरडा केला. त्यामुळे इतर प्रवाशांनी डब्यातून उड्या मारल्या. त्याचवेळी विरूध्द दिशेने कर्नाटक एक्स्प्रेस येत होती. तिच्याखाली अनेक जण सापडले. कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने हॉर्न वाजविला असता तर प्रवासी सावध झाले असते…

जळगावमधील लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी कथन केलेला अपघाताचा थरार शहारे आणणारा होता. पुष्पक एक्स्प्रेस सायंकाळी साडेसात वाजता मनमाड रेल्वे स्थानकात दाखल झाली. इंजिनपासून पाचव्या बोगीत हे प्रत्यक्षदर्शी प्रवास करत होते. यातील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांनी अपघाताविषयी माहिती दिली. या गाडीतून प्रवास करणारा विश्वास यादव (२८) या तरूणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तो मनमाड रेल्वे स्थानकात उतरला. अन्य एक जखमी प्रवासीही मनमाड स्थानकात उतरला. तर इतर अनेक किरकोळ जखमी साधारण डब्यातून प्रवास करत होते. ही गाडी मनमाड स्थानकात आल्यानंतर रेल्वेचे यातायात पथक तांत्रिक आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गाडीची तांत्रिक पहाणी करत साधारण डब्यांत जाऊन प्रवाशांची विचारपूस केली. अपघाताचा थरार बघणारे प्रवासी सुन्न व काहीही न बोलण्याच्या मनःस्थितीत होते.

हेही वाचा >>>त्र्यंबकेश्वरात उद्यापासून संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव

जळगाव रेल्वे स्थानकातून गाडी निघाल्यानंतर परधाडे रेल्वे स्थानकाजवळ एका बोगीला आग लागल्याची दुर्घटना घडल्याचे जखमी प्रवाशांचे म्हणणे आहे. तर काही प्रवाशांनी ही केवळ अफवा असल्याचे नमूद केले. प्रसंग अतिशय बाका होता. कारण शेजारच्या मार्गाने वेगाने गाडी धावत होती, अशी माहिती प्रवासी इर्शाद अहमद, सलीम अन्सारी आणि जखमी विश्वास यादव यांनी दिली. परधाडे रेल्वे स्थानकांतून गाडी वेगाने जात असतांना आगीच्या कथित अफवेमुळे खळबळ उडाली. प्रत्यक्षात पुष्पक एक्स्प्रेसने अचानक ब्रेक लावल्यामुळे तिच्या चाकांमधून ठिणग्या उडाल्या होत्या. प्रवाशांनी धावत्या गाडीतून पलिकडच्या बाजूने म्हणजे दुसऱ्या लोहमार्गाकडे उड्या मारल्या. ज्या ठिकाणी घटना घडली, तेथे मोठे वळण होते. त्यामुळे दुसऱ्या मार्गावरून रेल्वे येत असल्याचे उड्या मारणाऱ्यांच्या लक्षात आले नाही. रेल्वे अधिकाऱ्यांकडून पुष्पकमधील प्रवाशांनी रेल्वेची चैन ओढली, काही प्रवासी रेल्वेतून दुसऱ्या मार्गावर जातांना कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडविले, असे सांगितले जाते.

Story img Loader