लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : हिवाळी शाळेतील मुलांची गुणवत्ता अभूतपूर्व असून गणितावरील प्रभृत्व, राज्यघटनेचे कलम, मुलांनी परिश्रमातून साकारलेली परसबाग, गायीचा गोठा हे सारे पाहता आजच्या स्पर्धात्मक युगात या शाळेचे नाव देशपातळीवर अधोरेखित झाल्याशिवाय राहणार नाही. मुलांच्या बौद्धिक पातळीनुसार त्यांना शिक्षण देणारे शिक्षक हे जादुगार आहेत, अशी प्रशंसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारत लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाला. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खा. भास्कर भगरे, आ.हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदी उपस्थित होते.

यावेळी शिंदे यांनी दुर्गम भागात हिवाळी शाळेच्या माध्यमातून मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण प्राप्त होत असून हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे सांगितले. हिवाळी शाळा राज्यासाठी पथदर्शी ठरेल. शिक्षक केशव गावित यांच्या जिल्हा परिषद शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आदर्श इतर शिक्षकांनीही घ्यावा. हिवाळी शाळेसाठी आवश्यक सेवा-सुविधांची तरतूद शासनस्तरावर केली जाईल, असे नमूद करत शिंदे यांनी हिवाळी शाळेस पुन्हा भेट देण्याचे आश्वासन दिले.

शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी, शिक्षक केशव गावित आणि सहकारी शिक्षकांकडून समर्पित भावनेने वर्षाचे ३६५ दिवस मुलांना ज्ञानार्जन होत असल्याबद्दल कौतुक केले. महाराष्ट्रातून असे उपक्रमशील शिक्षक शोधून हिवाळी शाळेचा उपक्रम येणाऱ्या काळात राज्यभरात राबविला जाणार असल्याचे सांगितले. लोकार्पण सोहळ्यापूर्वी शिंदे यांनी प्रथम जुनी शाळा आणि मुलांनी तयार केलेल्या परसबागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नवीन इमारतीला भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिंदे यांच्या हस्ते शिक्षक केशव गावित यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांना शाळेसाठी पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्यात आले. शाळेसाठी स्वतःची एक एकर जमीन देणारे शेतकरी हरिदास भुसारे यांचाही सत्कार झाला. त्यांनाही रुपये पाच लाख अर्थसहाय्य देण्यात आले.

Story img Loader