जळगाव : शहरात रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामाविषयी जळगावकरांची ओरड होत आहे. कामे निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शिवाय, काही भागांत रस्त्यांची दैना झाली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारीच रस्त्यावर उतरुन प्रस्तावित कामे आणि सुरू असलेल्या रस्तेकामांची पाहणी केली. रस्त्यावरील धक्केमय प्रवासाचा जिल्हाधिकाऱ्यांनी अनुभव घेत प्रस्तावित व सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता न राखल्यास मक्तेदारावर कारवाई करण्याचा इशाराही दिला. या रस्त्यांचे परीक्षण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरात ३८ कोटींच्या निधीतून ४९ रस्त्यांची कामे केली जात आहेत. पैकी दहा रस्त्यांची बीएमपर्यंत कामे झाली आहेत. इतर निधीतून मंजूर रस्तेकामांच्या गुणवत्तेबाबत जळगावकरांच्या वाढत्या तक्रारी आहेत. त्यांची दखल घेत जिल्हाधिकारी मित्तल यांनी शुक्रवारी सायंकाळी क्रीडा संकुलाकडून रिंग रोडकडे जाणारा मार्ग, रिंग रोड चौफुली ते गणेश कॉलनी, नवसाचा गणपती मंदिर, एस. एम. आय. टी. महाविद्यालय, दूध फेडरेशन, जिल्हा रुग्णालय यांसह इतर परिसरातील रस्त्यांवर उतरत पाहणी केली.
यावेळी महापालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता योगेश अहिरे, मक्तेदार आदित्य खटोड, नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यासह महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मित्तल हे रस्त्यांची पाहणी करीत असल्याची माहिती मिळताच शासकीय यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाल्याचेही दिसून आले. जिल्हा रुग्णालयासमोरील रस्तेकामाच्या कार्यादेशाविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली.