२७ नोव्हेंबर ते आठ फेब्रुवारी कालावधीत शिबिरांचे आयोजन 

लघू-मध्यम उद्योगांच्या बळकटीकरणासाठी बँक ऑफ महाराष्ट्रसह इतर बँका आणि नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) यांच्या पुढाकारातून जिल्ह्य़ात २१ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबर ते आठ फेब्रुवारी या कालावधीत हे शिबिरे होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) विकासाला चालना देण्यासाठी  अंतर्गत १२ योजना जाहीर केल्या आहेत. त्याअंतर्गत हे शिबिरे होणार आहेत.  लघू-मध्यम उद्योजकांना ५९ मिनिटांत कर्ज मंजूर करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत निमाचे पदाधिकारी आणि अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाची माहिती दिली.  लघू-मध्यम उद्योगांना चालना देण्याकरिता  बँक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित जिल्हा उद्योग केंद्र, विक्रीकर, पीएफ, ईआयसी आदी कार्यालये आणि बँकांनी संयुक्तपणे १०० दिवस उद्योजकांना शिबिराद्वारे मार्गदर्शन करावे, असे पंतप्रधान कार्यालयाचे आदेश आहेत. या अनुषंगाने उद्योजकांची प्रमुख संस्था असणारी निमा आणि सर्व बँका यांच्यावतीने शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शिबीर आणि चर्चासत्रांचा निमा, लघु उद्योग भारती, आयमा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, उद्योगमित्र या औद्य्ोगिक संघटनांचे सभासद, उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.  निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष नितीन वागस्कर, शशिकांत जाधव, निमा औद्य्ोगिक धोरण-विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार आदींनी केले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक बाळासाहेब टावरे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी भरत बर्वे उपस्थित होते.

मदत केंद्राद्वारे मार्गदर्शन

२७ नोव्हेंबर ते आठ फेब्रुवारी या कालावधीत होणारी ही शिबिरे आठवडय़ाच्या दर मंगळवारी आणि शुक्रवारी होतील. त्यातील १६ शिबिरे निमाच्या सातपूर येथील सभागृहात होणार आहेत.  इतर शिबिरे येवला, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी येथे होणार  आहेत. या उपक्रमांतर्गत १० आणि ११ जानेवारी रोजी निमाच्या सातपूर येथील प्रांगणात बँक आणि विमा यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. उपरोक्त योजनांबाबत ‘निमा’त मदत केंद्र सुरू केले जात आहे. कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेदरम्यान उद्योजकांनी संपर्क साधावा तसेच योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.