नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षाच्या बालकाच्या संशयास्पद मृ़त्यूमुळे आश्रमाच्या कामकाजासह विद्यार्थी सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकारानंतर आश्रमातील बालके घाबरली असून प्रचंड दबावाखाली आहेत. पोलीस विभागही याविषयी बोलण्यास तयार नाही. नाशिक -त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आधारतीर्थ आश्रम आहे. एका टेकडीवर आश्रम इमारत तसेच पत्र्याच्या शेडमध्ये पसरला आहे. या ठिकाणी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या निराधार मुलांचा सांभाळ केला जातो. सद्यस्थितीत या ठिकाणी शून्य ते १८ वर्ष आतील ७२ मुलगे आणि २० हून अधिक मुली आहेत. आश्रमातील बालके, त्यांच्या देखभालीसाठी कर्मचारी आहेत. मात्र बालकांच्या सुरक्षेविषयी पोलिसांसह प्रशासन अनभिज्ञ आहे. मंगळवारी सकाळी आश्रमाच्या आवारात लहानगा आलोक मृतावस्थेत आढळला. या घटनेनंतर त्र्यंबक पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशीही चौकशीसत्र सुरू राहिले.
हेही वाचा >>> लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षकपदाची सूत्रे शर्मिष्ठा वालावलकरांकडे
याविषयी पोलीस निरीक्षक रणदिवे यांनी माहिती दिली. आश्रमशाळेतील घटना घडल्यापासून विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण बालके बोलण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांच्यावर कसला तरी दबाव आहे. मुले या प्रकारामुळे घाबरली आहेत. विद्यार्थी सुरक्षेविषयी संस्थेचे संस्थापक त्र्यंबक गायकवाड हेच माहिती देऊ शकतील. बुधवारीही कर्मचारी, बालकांकडे चौकशी करण्यात आली, असे रणदिवे यांनी सांगितले. दरम्यान, बालकाच्या मृत्यूनंतर राज्यातील काही पालकांनी आश्रमात धाव घेण्यास सुरूवात केली आहे. महिला बाल कल्याण विभागाकडूनही या प्रकाराची दखल घेत पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. बाल कल्याण समितीला आश्रमात भेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बालकाच्या हत्येचा संशय
मयत बालक आलोक शिंगारे अवघ्या चार वर्षाचा आहे. त्याचा मोठा भाऊ याच आश्रमशाळेत शिकत असून तो ११ वर्षाचा आहे. चिमुकल्याचे नववीतील एका मुलाशी भांडण झाले होते. त्यातूनच ही हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी हा प्रकार उघड झाल्यानंतर त्र्यंबक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आलोकच्या गळ्यावर गळा दाबल्याची निशाणी दिसून आली. हा प्रकार मयत आलोकच्या घरी कळल्यानंतर नातेवाईकांनी आश्रमात धाव घेतली. मंगळवारी रात्री उशीराने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संस्था वादग्रस्त
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एका टेकडीवर त्र्यंबक गायकवाड या व्यक्तीने आधारतीर्थ आश्रम सुरू केला. या ठिकाणी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिकविण्याची जबाबदारी घेतली जाते, असा दावा संस्थेकडून केला जातो. यातील काही बालके ही आत्महत्याग्रस्त पालकांची मुले आहेत तर काही परिसरातील गावांमधील गरीब कुटूंबातील मुले आहेत. संस्थेला महिला व बाल कल्याण विभागाची मान्यता नसून कुठलीही शासकीय मान्यता नसतांना संस्थेचा आजवर कारभार सुरू आहे. संस्थेत गरीब व गरजु मुले असल्याचा देखावा निर्माण करत देणगीदार, लोकप्रतिनिधी, राजकीय मंडळीकडून पैसे घ्यायचे, परंतु बालकांसाठी काही करायचे नाही, उलट पालकांकडेही काही वेळा धान्य किंवा वस्तुची मागणी केली गेली, अशा तक्रारी आहेत. देणगी, मदत मिळण्यासाठी बालकांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात येते, असे प्रकार सातत्याने घडू लागल्यावर प्रारंभी संस्थेविषयी वाटणारी सहानुभूती कमी होत गेली.