स्थावर मालमत्तांशी संबंधित दस्तावेजांची नोंद होणाऱ्या उपनिबंधक कार्यालयात गर्दीमुळे नागरिक आणि व्यावसायिकांना बराच वेळ थांबावे लागते. या कार्यालयातून शासनाला सर्वाधिक महसूल मिळतो. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांना विशेष सुविधा देण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयात आरामदायी विश्रांतीची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या २०२३-२५ वर्षाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा विखे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. शासनाच्या धोरणात सकारात्मक बदल होत असून सुलभपणे उद्योग करता यावेत म्हणून अनेक प्रचलित नियमांमध्ये बदल केले जात आहेत. शासनाने नुकतेच वाळू धोरण घोषित केले आहे. क्रेडाईच्या सदस्यांनी बांधकाम क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे व्यावसायिकांनी उभारावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुद्रांक नियंत्रक व नोंदणी महानिरीक्षक यांच्या कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल होत असून त्याचा फायदा नागरिकांना होईल. जलद वाहतूक व्यवस्थेमुळे शहराच्या लगतच्या भागाच्या विकासाला चालना मिळेल असे त्यांंनी सांगितले.

हेही वाचा >>> नाशिक : २५२ जागांसाठी २४२० अर्ज, १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक, आज छाननी

यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी घरपट्टी, प्रस्तावित वळण रस्ता व आगामी कुंभमेळा आदी विषयांवर मुख्यमंत्री संपूर्ण दिवस बैठक घेणार असल्याचे सांगितले. विकासाला चालना मिळण्यासाठी नाशिकचे विपणन गरजेचे असून नाशिक-पुणे जलदगती रेल्वे प्रकल्पालाही गती देण्यात येणार आहे. सर्व लोकप्रतिनिधी शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. पदग्रहण सोहळ्यात नूतन अध्यक्ष कृणाल पाटील यांनी कार्यकारिणीसह क्रेडाई नाशिक मेट्रोचे मावळते अध्यक्ष रवी महाजन यांच्याकडून पदभार स्वीकारला. वरिष्ठांचे मार्गदर्शन व युवा सदस्यांचे सहकार्य यामुळे क्रेडाई नाशिक मेट्रो येत्या काळात नवीन उंची गाठेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. नव्या कार्यकारिणीत मानद सचिव म्हणून गौरव ठक्कर, उपाध्यक्षपदी दीपक बागड, सुजॉय गुप्ता, जयंत भातंब्रेकर, नरेश कारडा, कोषाध्यक्ष म्हणून हितेश पोतदार तर सहसचिवपदी सचिन बागड, अनिल आहेर, नरेंद्र कुलकर्णी आदींचा समावेश आहे. याप्रसंगी सीमा हिरे, देवयानी फरांदे, सत्यजित तांबे या आमदारांसह क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्रेडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, जितू ठक्कर, सुनील कोतवाल, सुरेश पाटील, नेमिचंद पोतदार आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrishna vikhe patil assurance about sub registrar office in credai nashik metro event zws
Show comments