मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोकोवेळी राधाकृष्ण विखे यांचा इशारा
दुष्काळ, पाणी टंचाई यामुळे शेतकरी होरपळत असताना भाजपचे मंत्री कोणी डाळ तर कोणी चिक्की खात आहे, कोणी जमिनी बळकवण्यात मग्न आहे, असा आरोप करतानाच शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास थेट मंत्रालयावर कांदा फेक आंदोलन करण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला. कांद्याला दोन हजार रुपये हमी भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांबाबत काँग्रेस आघाडीने सोमवारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथे रास्तारोको आंदोलन केले. त्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारीही सहभागी झाले. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर, पोलिसांनी आधीच वाहतूक अन्य मार्गाने वळवल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही.
भाजप-सेना सत्तेत आल्यापासून शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शासन अजून किती आत्महत्या होण्याची वाट पहात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा गाव पातळीवर सुरू असलेले हे आंदोलन मुंबईत केव्हा पोहोचेल हे सरकारला कळणार नाही.
शेतकऱ्यांचा हा उद्रेक खेडय़ा-पाडय़ातून मंत्रालयापर्यंत पोहोचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कांदा उत्पादकांना दोन हजार रुपये हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी, दुष्काळग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे आदी मागण्यांचे निवेदन विखे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले. काँग्रेसच्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड व इतर पदाधिकारी सहभागी झाले. आव्हाड यांनी भाजप हा शेठजींचा पक्ष असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे त्यांना देणेघेणे नसल्याची टीका केली. बेशुध्द पडलेल्या सरकारला कांदे मारल्याशिवाय ते शुध्दीवर येणार नसल्याचे ते म्हणाले.
या आंदोलनाची पूर्वकल्पना मिळाल्याने पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक आधीच अन्य मार्गाने वळविली. परिणामी, महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही. जवळपास दीड तास ठिय्या देऊनही महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या नाहीत. रास्ता रोकोनंतर शहर काँग्रेसने विरोधी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा आणि नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे निश्चित केले होते. पत्रकारांशी संवाद साधताना विखे यांनी भाजप सत्तेत येऊन दोन वर्षे होत असतांना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत असल्याचे नमूद केले. राज्याचा विचार केल्यास पंकजा मुंडे, विष्णू सावरा, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली. या सर्व मंत्र्यांच्या कामकाजाची न्यायालयीन चौकशी व्हावी तसेच त्यांना पदावरून बडतर्फ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शहर कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांना विलंब नको हे कारण पुढे करत ऐनवेळी गुन्हेगारी विरोधातला मोर्चा रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली.