नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल याचिकेत जामीन मिळवण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उपस्थित रहावेच लागेल, असे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी नऊ मे रोजी होणार आहे.हिंगोली येथील सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी जाहीरपणे आक्षेपार्ह विधाने केल्याची तक्रार करत निर्भया फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी २०२२ मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात राहुल गांधी यांना कायदेशीर हुकूम बजावण्यात आले होते.
त्यानुसार शनिवारी त्यांनी हजर राहून जामीन घेणे अपेक्षित होते.परंतु, त्यांनी वकिलांमार्फत उपस्थितीबद्दल सवलत देण्याची विनंती केली. तसेच उपस्थितीबाबत कायमस्वरुपी सवलत देण्याची मागणी अर्जाद्वारे केली. त्यास आक्षेप घेतल्याचे निर्भया फाउंडेशनचे वकील मनोज पिंगळे यांनी सांगितले. कायमस्वरुपी सवलत मिळवण्याची ही वेळ नाही. प्रथम जामीन होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन होऊ शकत नाही, प्रत्यक्ष हजर राहून जामीन घ्यावा लागेल, असे मुद्दे ॲड. पिंगळे यांनी मांडले. न्यायालयाने ही बाब मान्य केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी नऊ मे रोजी होणार असल्याचे वकिलांनी सांगितले.