नंदुरबार – लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाची धामधूम महाराष्ट्रात सुरु असताना १२ मार्च रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा नंदुरबारमध्ये होणार आहे.
राहुल गांधी यांची नंदुरबारमध्ये सभा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी यांच्यासह इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सभास्थळ आणि गांधी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सर्व ठिकाणांची पाहणी केली. गांधी परिवार आणि नंदुरबारचे अतूट नाते असून देशातील काही प्रिय मतदारसंघांपैकी नंदुरबार एक आहे. इंदिरा गांधी, सोनिया, राजीव गांधी यांच्यानंतर आता राहुल गांधी हे नंदुरबारमध्ये दाखल होणार आहेत. लोकसभा निवडणूक आणि राहुल गांधी यांची यात्रा हा योगायोग असला तरी सर्वसामान्याच्या जीवनावर भाष्य करणारी न्याय यात्रेची महाराष्ट्रातील सुरुवात नंदुरबारमधून होणे हे महत्वाचे असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा – मविआचे जागा वाटप, फक्त चार जागांवर… बाळासाहेब थोरात यांचा विश्वास
हेही वाचा – मंत्री दादा भुसे यांच्या विरोधातील धुसफूस बाहेर
गांधी हे हेलिकॉप्टरने नंदुरबार पोलीस कवायत मैदानात उतरुन पुढे शहीद हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतील. त्यानंतर शहरातील सीबी पेट्रोल पंपलगतच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. काँग्रेस नेत्यांनी सर्व ठिकाणांची पाहणी करुन आढावा घेतला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समवेत माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी, प्रतिभा शिंदे, राजाराम पानगव्हाणे, आमदार शिरीष नाईक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.