लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेदरम्यान भेट देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भेट देऊन अभिषेक करणार आहेत. काँग्रेसला रामाचे काही वावडे नाही. यात्रेचा मार्ग वेगळा असल्याने गांधी हे काळाराम मंदिरात जाणार नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
खासदार गांधी यांची न्याय यात्रा बुधवारी नाशिक जिल्ह्यात दाखल होत आहे. या दिवशी प्रथम मालेगाव शहरात ‘रोड शो’ तसेच चौक सभेचे आयोजन करण्यात आले असून ते लोकांशी संवाद साधणार आहेत. रात्री सौदाणे येथील एका शेतात गांधी यांच्या ताफ्याचा मुक्काम असणार अहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी यात्रा चांदवडकडे रवाना होईल. सकाळी नऊ वाजता राहुल गांधी हे चांदवड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत हे देखील उपस्थित असतील. त्यानंतर पिंपळगाव बसवंत, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमार्गे यात्रा ठाणे जिल्ह्यातील मोखाडा येथे मुक्कामास जाणार आहे.
आणखी वाचा-महायुतीच्या जागा वाटपाआधी नाशिकचा उमेदवार कसा जाहीर झाला?
गुरुवारी दुपारी दोन वाजता गांधी यांचे द्वारका येथे आगमन होईल. यात्रेच्या निमित्ताने शहरात त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. गांधी यांनी पंचवटीतील श्री काळाराम मंदिरास भेट द्यावी, अशी काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भावना होती. अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा सत्ताधारी भाजपने प्रचारात आणला. त्याला शह देण्यासाठी या भेटीचा उपयोग होईल, अशी त्यांची धारणा होती. मागील दोन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मनसेचे राज ठाकरे आदी प्रमुख नेत्यांनी काळाराम मंदिरास भेट दिली आहे. त्यामुळे गांधी यांनी या मंदिरास भेट द्यावी, अशी अनेकांची भावना होती. तथापि, ते काळाराम मंदिरात जाणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत सांगितले. शहरातील रोड शो झाल्यानंतर गांधी हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिषेक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-नाशिक: रेल्वेत चढताना सोन्यासह रोकड लंपास; चोरास अटक
रोड शोचा मार्ग
गुरुवारी दुपारी खासदार राहुल गांधी यांच्या रोड शोला द्वारका येथून सुरुवात होऊन सारडा सर्कल-फाळके रोड- दूध बाजार – खडकाळी – गंजमाळ सिग्नल ते शालिमार अशा मार्गाने तो होणार आहे. शालिमार चौकात गांधी उपस्थितांना संबोधित करतील. रोड शोच्या पार्श्वभूमीवर, पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी फलक व झेंडे लावून तयारी केली आहे. रोड शोदरम्यान काँग्रेसच्या विविध संघटनांतर्फे तसेच युवक काँग्रेस, एनएसयुआय, महिला काँग्रेससह विविध विभागांच्या माध्यमातून ठिकठिकाणी स्वागताची तयारी करण्यात आली आल्याची माहिती. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली.