नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसाचे पिस्तूल आणि नऊ जिवंत गोळ्या ठेवलेली बॅग मनमाड रेल्वे स्थानकातून संशयिताने लंपास केल्यामुळे खळबळ उडाली आहे. चोरीला गेलेल्या पिस्तुलाचा कसोशीने शोध घेऊनही ते मिळाले नाही. याप्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे सुरक्षा दलातील साहाय्यक निरीक्षक सुमित सैनी यांनी तक्रार दिली. सैनी हे हावडा एक्स्प्रेसने मलकापूर ते मनमाडदरम्यान आपल्या चार सहकाऱ्यांसमवेत धावत्या गाडीत गस्त घालत होते. ही गाडी मध्यरात्री मनमाडला आली. त्यानंतर ते पुणे-नागपूर एक्स्प्रेसने मनमाड ते मलकापूरदरम्यान गस्त घालण्यासाठी सज्ज झाले. ही गाडी रात्री साडेबाराच्या सुमारास मनमाड स्थानकावर आली. गाडीच्या एस सात बोगीत ते आसनावर सहकाऱ्यांसोबत बसले. त्यावेळी सैनी यांनी आपल्याजवळील पिस्तूल व गोळ्या सहकारी मिश्रा यांच्या बॅगमध्ये ठेवली व बाथरूमला गेले. त्याच कालावधीत मिश्रा फलाटावर उतरले आणि मागे बसलेल्या सहकाऱ्यासमवेत तपासणी करताना गाडी सुरू झाली. बोगीत परत आल्यावर त्यांना आसनावर बॅग दिसली नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ झाली. त्यांनी याच गाडीत असलेल्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले आणि बोग्यांची तपासणी सुरू केली. पण बॅग मिळाली नाही. भुसावळ येथून ते पुन्हा मनमाडला आले. मनमाड शहरात तपासणी केली गेली. ही बॅग रिकाम्या अवस्थेत तुफान चौकाच्या पुढे बोहरी कंपाऊंड परिसरात मिळाली, पण त्यातील पिस्तूल व काडतुसे नव्हती.

Story img Loader