लोकसत्ता वार्ताहर
मनमाड: येथील रेल्वे जंक्शन स्थानकात आरक्षण तिकीटाचा काळाबाजार करणाऱ्याविरुध्द रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने कारवाई केली. या अंतर्गत संबंधिताला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ऑपरेशन उपलब्ध अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने ही कारवाई केली. न्यायालयाने संशयिताला रेल्वे पोलीस दलाची कोठडी सुनावली.
या संदर्भात रेल्वेच्या मुख्यालयातून मिळालेल्या माहितीच्या आधारे दलाचे उपनिरीक्षक प्रशांत गवई, सहायक उपनिरीक्षक रशीद खान यांच्यासह पथकाने मालेगांव येथे जावून छापा टाकला. समीर दोषी (४९, चित्रगुप्त नगर, संगमेश्वर, मालेगांव) या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याचा भ्रमणध्वनी, रेल्वे आरक्षण ई तिकीट, ओळखपत्र आणि लॅपटॉप तपासतांना त्याच्या लॅपटॉपमध्ये काही माहिती आढळली. ओळखपत्र तपासल्यावर दोन जुनी ई तिकीटे सापडली. ज्याची किंमत २३९२ रुपये आहे. हा सर्व मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला.
हेही वाचा… सुपर ५० उपक्रमांतर्गत रविवारी १६ केंद्रांवर निवड परीक्षा
अधिक तपास केल्यानंतर लॅपटॉप आणि आणखी एक भ्रमणध्वनी जप्त करण्यात आला. गरजू व्यक्तींना रेल्वे आरक्षण उपलब्ध करून देणार असल्याचे त्याने सांगितले. प्रतिव्यक्ती १०० ते २०० रुपये जास्त घेऊन ई तिकीट देऊन रेल्वे आरक्षण करून देतो. या संदर्भात त्याच्याकडे कोणतेही वैध दस्तावेज नसून त्याने रेल्वे तिकीटांचा अवैध धंदा सुरू केल्याची कबुली दिली. रेल्वे सुरक्षा दलाने गुन्हा नोंदविला असून त्यास कोठडी देण्यात आली.