जवळपास दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे जिल्ह्य़ातील काही भागात पुनरागमन झाल्यामुळे आशेची धुगधुगी निर्माण झाली आहे. पावसाअभावी दुष्काळाचे सावट गडद झाले असताना परतीच्या पावसाने किमान पिण्याच्या पाण्याचे संकट दूर व्हावे, अशी सर्वाची अपेक्षा आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस सोमवारी कायम राहिला. मात्र, त्यात म्हणावा तसा जोर नव्हता. सोमवारी दुपारी शहरात अचानक त्याने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
या वर्षी प्रारंभीच्या काळात हजेरी लावल्यानंतर गायब झालेल्या पावसाने नंतर अधूनमधून दर्शन दिले. मात्र, अनेक दिवसांपासून त्याची चाहूल नसल्याने सर्वत्र दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. नांदगाव, येवला, सिन्नर, मालेगाव, देवळा व चांदवड या पूर्व भागात त्याचे प्रमाण नगण्य राहिले. पावसात मोठा खंड पडल्याने खरिपाची पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असून बाजरी, भुईमूग, मका, सोयाबीन या प्रमुख पिकांचे उत्पादन निम्म्याने घटणार असल्याचे खुद्द कृषी विभागाने म्हटले आहे. दुसरीकडे पाणी टंचाईची तीव्रता वाढू लागली.
या स्थितीत रविवारी रात्रीपासून जिल्ह्य़ातील काही भागात पावसाचे पुनरागमन झाले. पिंपळगाव बसवंत या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सोमवारी सकाळपासून अनेक भागांत ढगाळ वातावरण होते.
नाशिकसह मनमाड, त्र्यंबकेश्वर काही भागांत त्याने हजेरी लावली. नाशिक शहरात दुपारी अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले. अनेक दिवसांनंतर असे चित्र पाहावयास मिळाले. अन्य काही भागांत पाऊस झाला असला तरी तो रिमझिम स्वरूपात होता.
हवामानशास्त्र विभागाने पाऊस परतीच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्य़ात सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४३ टक्के पाऊस झाला. गतवर्षी हे प्रमाण ६० टक्के इतके होते. पाणी टंचाईचे संकट दूर होण्यासाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे. त्यात काही अवरोध आल्यास वर्षभर भीषण स्थितीला तोंड द्यावे लागू शकते.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा हे तालुकेवगळता इतरत्र बिकट स्थिती आहे. पावसाअभावी धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत जलसाठय़ाचे प्रमाण ३२ टक्क्यांनी कमी आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात ७५ टँकरने १०० च्या आसपास गावे व सुमारे २०० पाडय़ांना पाणीपुरवठा केला जातो. नाशिक शहरात पाणी कपात लागू करण्याविषयी विचार सुरू आहे. यामुळे पावसाने सलग काही दिवस दमदार हजेरी लावण्याची गरज व्यक्त होत आहे.