धुळे : शासन सेवेत सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी करत कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचारी भरतीच्या शासन निर्णयाविरोधात येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केले. रणजीतराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा आदेश जाळून होळी करण्यात आली. राज्य सरकारने सहा सप्टेंबर रोजी काढलेल्या निर्णयात बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेऊन तसे आदेश दिले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यानुसार शिक्षक, अभियंता, ग्रामसेवक, लिपिक, वरिष्ठ सहायक, तांत्रिक अधिकारी, शिपाई, चालक आदी पदेही कंत्राटी पद्धतीने बाह्य यंत्रणेमार्फत भरले जातील. या निर्णयामुळे युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने म्हटले आहे.
हेही वाचा >>> नाशिकमध्ये टवाळखोर लक्ष्य; सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत २२४१ जणांवर कारवाई
राजकीय हस्तक्षेप होऊन पारदर्शकता राहणार नसल्याने हा निर्णय तत्काळ रद्द करावा, जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये काही वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे, जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे, त्यांना वयाच्या ५८ वर्षापर्यंत नोकरीची हमी द्यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी रणजीतराजे भोसले, वाल्मिक मराठे, निखिल मोमया, जगन टाकटे, डी. टी. पाटील आदी उपस्थित होते.