उत्तर प्रदेशात २५ ते ३० टक्के मते मिळणाऱ्या पक्षाला सत्ता मिळते, असा अनुभव आहे. भाजप, समाजवादी पार्टी, बसपा, काँग्रेस अशा चौरंगी लढती अपेक्षित आहेत. मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यात समझोता न झाल्यास पाचवा भिडू रिंगणात राहू शकतो. उत्तर प्रदेशात २० टक्क्यांच्या आसपास दलित तर १८ ते १९ टक्के मुस्लीम मतदार आहेत. दलित आणि मुस्लीम मतांचे एकगठ्ठा मतदान ज्या पक्षाला होईल त्याचा सत्तेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. यामुळेच भाजपने इतर मागासवर्गीय, अन्य छोटय़ा जातींवर लक्ष केंद्रित केले आहे. सुमारे १० टक्के  लोकसंख्या असलेल्या ब्राह्मण समाजाची एकगठ्ठा मते मिळावीत, असा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. दलित मते एकगठ्ठा मायावतींकडे जाऊ नयेत, असेही भाजपचे प्रयत्न आहेत. मुस्लीम मते भाजपला मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रारंभी भाजप, नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत मनसेने राज्यात प्रथमच काबीज केलेल्या नाशिक महापालिकेतील कार्यकाळ पूर्ण केला. विरोधी बाकावर बसून टीका करणे सोपे असते, परंतु सत्तास्थानी पोहोचल्यानंतर टीकेला तोंड देत, राजकीय तडजोडी करत प्रत्यक्ष काम करणे कसे अवघड ठरते याची अनुभूती या पाच वर्षांत मनसेने घेतली. कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास आलेल्या नाशिकमध्ये पक्षाला लागलेली घरघर रोखण्यासाठी राज ठाकरे अखेरच्या टप्प्यात विकासकामे जनतेसमोर मांडण्याची धडपड करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर चाललेला हा खटाटोप मनसेला तारणार काय, याचे उत्तर  निवडणुकीतून मिळणार आहे.

मागील महापालिका निवडणुकीवेळची मनसेची स्थिती आणि सद्य:स्थिती यामध्ये जमीन-आसमानचे अंतर आहे. आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधी मनसेने पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान, संगीत कारंजा, आकर्षक वाहतूक बेट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक आदी विकासकामांचे घाईघाईत लोकार्पण करत नव्याने तयारी सुरू केली. राज यांनी प्रत्यक्षात आणलेल्या अनोख्या संकल्पनांना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या दिग्गजांनी दाद दिली. या भव्यदिव्य प्रकल्पांमुळे नाशिकच्या सौंदर्यात भर पडली. मुंबईत शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा विषय रेंगाळला असताना मनसेने नाशिकमध्ये हे स्मारक उभारण्यात आघाडी घेतली. हा विषय नाशिकप्रमाणे मुंबई पालिका निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठरेल, असे मनसेचे गृहीतक आहे. राज्यातील कोणत्याही शहरात झाली नसतील इतकी कामे मनसेने नाशिकमध्ये केल्याचा दावा राज हे आता करतात. त्यांच्या संकल्पनेतील विकासावर  खुद्द मनसेतील बहुतांश नगरसेवकांनी विश्वास का ठेवला नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला.

निधीची चणचण

जकात रद्द झाल्यामुळे पालिकेचे उत्पन्न घटले अन् त्याचाही परिणाम विकासकामांवर झाला. प्रभागातील छोटय़ा-मोठय़ा कामांसाठी निधी मिळेनासा झाला. या स्थितीत सिंहस्थ कुंभमेळा मदतीला धावून आला. कुंभमेळ्यासाठी शहरात एक हजार कोटींहून अधिकची कामे झाली. प्रमुख रस्ते चकचकीत झाले. नवीन वर्तुळाकार रस्ते व पुलांची बांधणी झाली. पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अनेक कामे दृष्टिपथास आली. अर्थात, शासनाने त्याकरिता बराचसा निधी दिला असल्याने भाजप आणि मनसेत श्रेयावरून वाद आहेच. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने गोदावरी किनाऱ्यावरील गोदा उद्यान, पांडवलेणीच्या पायथ्याजवळील वन उद्यान, शहरातील प्रमुख चौकातील वाहतूक बेट व उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण आदी प्रकल्पांसाठी रिलायन्स फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट आदींकडून कोटय़वधींचा निधी मिळवण्यात यश मिळाले. त्यातील बरेचसे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. महापुराचे धक्के खाणारा गोदा उद्यान त्यास अपवाद राहिला.

२६ गेले, १३ उरले

आजवर २६ नगरसेवकांनी मनसेला रामराम ठोकला आहे. सध्या पक्षात केवळ १३ नगरसेवक आहेत. मनसेचे नगरसेवक पळविण्याची सेना व भाजपमध्ये स्पर्धा लागल्याने निवडणूक जाहीर होईपर्यंत काय घडेल हे सांगता येणे मुश्कील. निवडणुकीचा हंगाम आला की, पक्षांतर नवीन नसते. मतलई वारे लक्षात या घडामोडी घडतात, पण सुरुवातीला एकसंध राहिलेल्या पक्षाला गळती का लागली, याची कारणमीमांसा कधी मनसेने केली नाही. परिणामी, महापौरपदापासून ते मनसे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकारी यांच्यापर्यंतची मंडळी पक्षापासून दूर गेली. मनसेच्या गडाला हादरे बसण्याचे कारण पक्षाध्यक्षांनी काही विशिष्ट घटकांवर ठेवलेला अतिविश्वास आणि नाशिककडे केलेल्या दुर्लक्षात असल्याचे लक्षात येते.

शिवसेनेत असल्यापासून राज यांचे नाशिकशी ऋणानुबंध आहेत. त्यामुळे मनसेची स्थापना झाल्यापासून राज यांच्या पाठीमागे उभ्या राहिलेल्या स्थानिक धुरिणांमुळे पक्ष उत्तरोत्तर बळकट झाला. पालिकेतील तत्कालीन सेना-भाजपचा गलथान कारभार आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा अनुभव चांगला नसल्याने गतवेळी शहरवासीयांनी सर्वाधिक ३९ नगरसेवक निवडून देत मनसेला संधी दिली. नाशिक हे देशातील सुंदर शहर बनविण्याचा संकल्प राज यांनी प्रचारात सोडला होता. तेव्हा वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिक भयग्रस्त होते. या मुद्दय़ाला हात घालत त्यांनी राष्ट्रवादी व प्रामुख्याने छगन भुजबळांवर टीकास्त्र सोडले. गुन्हेगारीच्या विळख्यातून नाशिकची मुक्तता करण्याचे जाहीरपणे सांगणाऱ्या राज यांच्या मनसेने भाजपने साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादीशी तडजोड करण्यास मागेपुढे पाहिले नाही.

सत्ता काबीज झाल्यानंतर इतर राजकीय पक्षांप्रमाणे मनसेची भाषा बदलली. विकासकामांसाठी इतकी घाई कशासाठी, आपण काही जादूगार नसल्याने चमत्काराची अपेक्षा ठेवू नका, आमच्याकडे वर्ष-दोन वर्षांत विकासकामांची यादी कशी मागता.? असा सूर निम्म्या सत्ताकाळात खुद्द राज यांनी आळवला होता. विकासकामांचा नियमित आढावा घेण्याचे आश्वासन देणारे राज हे नाशिककडे फिरकेनासे झाले. अधूनमधून धावता दौरा करून ते मुंबईला अंतर्धान व्हायचे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray and mns