राज ठाकरे यांचा दावा; स्थानिक पातळीवर मनसेच्या स्थितीविषयी बोलणे टाळले

राज्यातील इतर शहरांमध्ये झाली नसतील इतकी कामे मनसेने नाशिकमध्ये केली असून मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजनेमुळे पुढील तीन दशकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, सत्ताधारी मनसेला गळती लागली आहे. २६ नगरसेवकांनी आतापर्यंत मनसेला सोडचिठ्ठी दिली. या घडामोडींमुळे वैतागलेल्या राज यांनी चार ते साडेचार महिने नाशिकला राजकीय दौरा टाळला होता. अखेरीस त्यांचे सोमवारी आगमन झाले. मात्र स्थानिक पातळीवर मनसेच्या स्थितीविषयी त्यांनी बोलणे टाळले.

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे असल्याने तत्पूर्वी विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि निवडणुकीची तयारी याकडे लक्ष लावून बसलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जीव राज यांच्या दौऱ्याने भांडय़ात पडला. दोन ते तीन महिन्यांपासून त्यांचा दौरा वेगवेगळ्या कारणांस्तव पुढे ढकलला गेला. याच काळात मनसे नगरसेवक पक्ष सोडून जात होते.

त्यांना रोखण्याचा प्रयत्न पक्षाध्यक्ष वा इतर पदधिकाऱ्यांकडून झाला नाही. निवडणुकीला सामोरे जातना मनसेची कामे शहरवासीयांसमोर जावीत, या उद्देशाने अखेरीस या दौऱ्याचे नियोजन झाले.

राज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनसेने शहरात चांगली कामे करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला. इतर शहरांमध्ये झाली नसतील, इतकी कामे मनसेने नाशिकमध्ये केली आहेत. मुकणे धरण जलवाहिनी योजनेमुळे नाशिकमध्ये पुढील तीस वर्षे पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय विषयावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, गत पंचवार्षिक निवडणुकीत नाशिकमध्ये मनसेचा चांगलाच बोलबाला होता. पालिकेची सत्ता हाती येऊनही नगरसेवक पक्ष सांभाळू शकला नाही. निम्म्याहून अधिक जणांनी पक्षांतर केले. पालिका निवडणुकीपर्यंत हा आकडा आणखी किती कमी होईल याची पदाधिकाऱ्यांना धास्ती आहे. सध्याच्या राजकीय स्थितीविषयी राज यांनी काही निवडक पदाधिकाऱ्यांशी नंतर चर्चा केल्याचे सांगण्यात आले.

राज ठाकरे यांच्याकडून कामांचा आढावा

पहिल्या दिवशी राज यांनी मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजना प्रकल्प, खत प्रकल्पाच्या पाहणीबरोबर शहरातील उड्डाण पुलाखालील चाललेल्या सुशोभीकरणाच्या कामास प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. सायंकाळी गंगापूर रस्त्यावरील शस्त्रसंग्रहालय, होळकर पुलाजवळचा जिनिव्हा फाऊंटन आणि टाटा औषधी वनस्पती उद्यानाला भेट देण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन राहिले. औषधी वनस्पती उद्यान व जिनिव्हा फाऊंटन या प्रकल्पांचे मंगळवारी सायंकाळी राज यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे. महापालिकेने गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी उचलण्याच्या प्रकल्पाच्या धर्तीवर मुकणे धरणाच्या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. आगामी तीस वर्षांनी नाशिकची लोकसंख्या किती असेल याचे गृहीतक मांडून सुमारे २६५ कोटीची ही योजना साकारली जात आहे. या प्रकल्पाच्या कामाची पाहणी राज यांनी केली. पालिकेचा खत प्रकल्पही खासगी तत्त्वावर चालविण्यास दिला गेला आहे. या सर्वाचा आढावा घेतला.