नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात दिंडोरी, कळवण, चांदवड, सटाणा या ठिकाणी भेट दिली. यापैकी काही भागात त्यांनी पहिल्यांदाच भेट दिल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. यापैकी काही ठिकाणी त्यांचे जोरदार, तर काही ठिकाणी साधारण स्वागत झाले. मनसे पदाधिकारी, व्यापाऱ्यांसोबत चर्चा करीत ठाकरे यांनी आपला धावता दौरा आटोपला.
न्यायालयीन प्रकरणांसह आगामी निवडणुका, जिल्ह्य़ातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती, कार्यकारिणीत बदल यासह अन्य काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे पाच दिवसाच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतशबाजी दिसून आलेली नाही. बुधवारी दिंडोरी येथे मनसेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राज यांची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांची छबी भ्रमणध्वनीमध्ये घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
मागील वर्षी टोलनाक्याविरुद्ध मनसेने केलेल्या आंदोलनात येथील काही स्थानिक युवकांनी तोडफोड केली होती. आंदोलन स्थगित झाले, पण या प्रकरणात ज्या युवकांवर गुन्हे दाखल झाले ते तसेच असल्याने याविषयी स्थानिकांमध्ये विशेषत युवा वर्गात नाराजी आहे. ही नाराजी यावेळी काही जणांनी व्यक्त केली. गर्दीमध्ये कार्यकर्ते अधिक असले तरी सर्वसामान्य मात्र फारसे नव्हते.
कळवण येथे ठाकरे यांनी उद्योजक बेबीलाल संचेती यांच्या निवासस्थानी बंद दाराआड मनसे पदाधिकारी, व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. शेतकऱ्यांना मनसे तुमच्या पाठीशी असल्याचा धीर दिला. उद्योजकांनाही त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे प्रयत्न करेल, असा विश्वास दिला. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या, त्यांच्या प्रश्नासाठी लढा, असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. कळवण शहरातील शासकीय कार्यालये शहरापासून पाच किलोमीटरवर स्थलांतरित झाल्याने व्यापारीवर्गावर जे आर्थिक संकट कोसळले आहे त्याकडे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती यांनी लक्ष वेधले. तालुक्यातील गड, किल्ले दुरवस्थेबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. सरकारी रुग्णालयातील गैरकारभार, धूळखात पडलेली यंत्रणा, रुग्णांना होणारा त्रास याबाबत कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या सोबत चर्चा केली. सटाण्याकडे प्रस्थान करताना देवळा येथे ठाकरे यांनी गाडीतून बाहेर पडण्याची तसदीही घेतली नाही. सटाणा येथे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत कांद्यासह अन्य काही विषयांवर चर्चा करण्यात आली.