नाशिक शहर आणि जिल्हा संघटनेतील अनेक पदाधिकारी काम करत नाहीत. संघटना मजबूत करण्याऐवजी पक्षात अंतर्गत राजकारण वाढीस लागले आहे. अनेकांकडून परस्परांविरुद्ध तक्रारी झाल्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे हे कमालीचे नाराज असून ते नाशिक जिल्हा व शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याची शक्यता मनसेच्या गोटातूनच व्यक्त केली जात आहे. ३० जानेवारी रोजी मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे. त्यानंतर शहर व जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले जाते.

विधानसभा निवडणुकीनंतर गुरुवारी प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे शहरात आगमन झाले. पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक दिनकर पाटील, रतनकुमार इचम, सलीम शेख, सुजाता डेरे, मनोज घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते. राज यांनी सात ते आठ जणांच्या गटानुसार पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नाराज पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीगाठीत पक्षांतर्गत गटबाजीचे दर्शन राज यांना घडले. अनेकांनी परस्परांविरोधात तक्रारी केल्या. काहींनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. विश्वासात घेतले जात नाही, पक्ष संघटना वाढविण्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार केली गेली. एकंदर स्थिती पाहून राज हे स्थानिक कार्यकारिणी बरखास्त करतील, असा दावा काही पदाधिकाऱ्यांनी केला. यासंदर्भात मनसेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधूनही ते उपलब्ध झाले नाहीत. पक्षात कुणीही नाराज नसल्याचे काहींनी सांगितले.

देवयानी फरांदे यांची सदिच्छा भेट

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी सदिच्छा भेट घेतली. पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना आमदार फरांदे हॉटेलमध्ये आल्या. यावेळी डॉ. प्रदीप पवार उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर राज ठाकरे आणि आमदार फरांदे यांची भेट झाली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात मनसेने फरांदे यांच्याविरुध्द उभ्या असलेल्या आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला होता.

Story img Loader