नाशिक – राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना १८ ते २० मे या कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीस प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, सलिम शेख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राज यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सकारात्मक वातावरणात चर्चा झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. राज यांच्या उपस्थितीत बैठका होऊन पुढील रणनीती निश्चित होण्याची शक्यता आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेने स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी मध्यंतरी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. जिल्हा व शहर पातळीवरील प्रमुख पदांमध्ये खांदेपालट करण्यात आले. महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी राज यांनी यापूर्वीच अमित ठाकरे यांच्यावर सोपविलेली आहे. अमित यांनी नाशिक दौरे करून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद राखला. गेल्या महिन्यात मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्या राजीनाम्याने पक्षातील अस्वस्थता समोर आली. राज यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. परंतु, शीर्ष नेतृत्वाकडून दुर्लक्ष, संघटनात्मक पातळीवरील मरगळ आणि बदलत्या राजकारणाने अधांतरी होऊ पाहणारे भवितव्य यातून मनसेतील अस्वस्थता चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
हेही वाचा – जळगाव : मालवाहू वाहनाच्या धडकेने चार गंभीर जखमी
कधीकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला होता. महानगरपालिकेत मनसेची सत्ता होती. शहरात पक्षाचे तीन आमदार होते. नंतर पक्षाला घरघर लागली. अनेकांनी भाजपासह अन्य पक्षांचे पर्याय निवडत मनसेला रामराम ठोकला. त्यामुळे मागील मनपा निवडणुकीत पक्षाचे केवळ बोटावर मोजता येतील इतकेच नगरसेवक निवडून आले होते. मनपाची सत्ता गेल्याचे शल्य राज यांना कायम राहिले. पुढील काळात त्यांचे नाशिककडे काहिसे दुर्लक्ष झाले. पण आता त्यांनी नाशिकमध्ये पुन्हा लक्ष घातले आहे. गेल्यावेळी महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता होती. त्यांना गरज नसतानाही मनसेकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथ दिली गेली. आगामी निवडणुकीत मनसे-भाजपा युती होईल का, याबाबत पदाधिकाऱ्यांना उत्सुकता आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यात काही बाबी स्पष्ट होतील अशी त्यांना अपेक्षा आहे.