कुंभमेळ्यात आतापर्यंत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, सेना-भाजपचे बहुतांश मंत्री व पदाधिकारी, काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते हजेरी लावून विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी धडपडत असतानाच बुधवारी राज ठाकरे यांनीदेखील साधूग्राममध्ये भेट देऊन मनसेही या स्पर्धेत असल्याचे अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले. राज यांचा दौऱ्यातील पहिला दिवस तसा देव व साधू-महंत दर्शनाचा ठरला. सकाळी राज यांनी पत्नीसह वणी गडावर जाऊन सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या वाहनाचा ताफा तपोवनात महापालिकेने साकारलेल्या साधुग्राममध्ये धडकला. वारकरी संप्रदायाच्या माऊलीधाम खालसा आणि अखिल भारतीय पंच निर्वाणी आखाडय़ातील महंतांची भेट घेतली. सिंहस्थानिमित्त झालेल्या विकासकामांमुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलला आहे. त्याचे श्रेय पालिकेतील सत्ताधारी मनसेचे असल्याचे चित्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फलकांद्वारे रंगविले आहे.राज्यासह देशभरातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सिंहस्थात हजेरी लावल्यानंतर आता राज ठाकरे हेदेखील चारदिवसीय दौऱ्यावर नाशिकमध्ये दाखल झाले. बुधवारचा दिवस त्यांचा देवदर्शनाचा ठरला. राज हे पत्नी शर्मिला यांच्यासमवेत सकाळी मोटारीने वणी गडाकडे निघाले. या वेळी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह स्थानिक पदाधिकारी होते. वणी गडावर सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर ठाकरे यांच्या वाहनाचा ताफा नाशिकमध्ये येण्यास निघाला. शहरात प्रवेश केल्यानंतर राज हे थेट साधुग्राममध्ये गेले.अखिल भारतीय वारकरी संप्रदायाच्या माऊलीधाम खालसाचे महंत रघुनाथदास ऊर्फ फरशीवाले बाबा यांची भेट घेतली. वारकरी संप्रदायाच्या आखाडय़ाला भेट दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे दर्शन घडल्याची प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली. रघुनाथदास महाराजांनी ठाकरे पती-पत्नीला ज्ञानेश्वरी व साडी भेट दिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव राज यांनी नंतर अखिल भारतीय पंच निर्वाणी आखाडय़ाला भेट दिली. महंत धर्मदास महाराज यांनी त्यांना आशीर्वाद दिले. साधुग्राममध्ये तीन आखाडे आणि त्याअंतर्गत सुमारे ७०० खालसे आहेत. पण त्यांनी केवळ दोन ठिकाणी भेट दिली. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास राज यांनी नकार दिला.दुपारनंतर स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा असा त्यांचा कार्यक्रम होता. शुक्रवारी पांडवलेणीच्या पायथ्याशी ‘बोटॅनिकल गार्डन’च्या कामाचे भूमीपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गोदा उद्यानाच्या धर्तीवर या गार्डनच्या उभारणीची जबाबदारी टाटा समूहाने स्वीकारली आहे. त्या संदर्भातील करार करण्यात येणार असल्याचे मनसेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. कुंभमेळ्यानिमित्त झालेल्या कामांच्या श्रेयावरून सध्या राजकीय पातळीवर कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. सत्ताधारी भाजप-सेना श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच पद्धतीने सिंहस्थाचा आराखडा तयार करणाऱ्या तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची ती धडपड आहे. महापालिका ताब्यात ठेवणाऱ्या मनसेला सिंहस्थामुळे कामे करण्याची संधी मिळाली.पालिकेची सत्ता मिळाल्यानंतर प्रारंभीच्या दोन ते तीन वर्षांत मनसेने काम केले नसल्याची ओरड झाली. त्याचा फटका लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसला. आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा तसे काही घडू नये म्हणून मनसेने चांगलीच दक्षता घेत आहे.सिंहस्थानिमित्त शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिला. या माध्यमातून झालेल्या कामांचे विपणन मनसे करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे यांचे छायाचित्र असणाऱ्या फलकावर ‘या नाशिक पाहायला या..’ अशी साद भाविकांना घालण्यात आली आहे. शहरात सर्वदूर वेगवेगळ्या आशयाचे मनसेचे फलक झळकत आहेत.सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते कुंभात वेगवेगळ्या माध्यमातून सहभागी होत असताना त्यात मनसे कुठे पिछाडीवर राहू नये, असा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न  राहिला. राज यांनी साधुग्रामला दिलेल्या भेटीने ही बाब अधोरेखित केली.

 

Story img Loader