जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दुष्काळी प्रदेश अधिक पावसाच्या प्रदेशात रूपांतरित करणे शक्य असून ही योजना निराशेला आशेत बदलण्याचा कार्यक्रम आहे, असे मत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
जलसंधारण व कृषी विभागातर्फे शनिवारी नियोजन भवन येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
जलसंरचनेवर अतिक्रमण, नद्यांचे प्रदूषण, भूजलाचा पुनर्भरणाऐवजी आधिक्याने वापर आणि पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे विवाद या आजच्या प्रमुख समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले. या समस्यांच्या निराकरणासाठी जलसाक्षरतेच्या माध्यमातून नदी प्रदूषण टाळणे आणि जलसंरचना ओळखून पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. अशी जलक्रांती घडविण्याची प्रत्येकात क्षमता आहे.
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या क्षमतेचा जाणिवेने वापर करून गावातील पाणी समस्या दूर करावी, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामस्थांनी एकत्र बसून पाणी कुठे अडवायचे आणि योजना कशा प्रकारे राबवायची याचा विचार करणे गरजेचे आहे. ओढय़ाचे पाणी वरील भागात अडविले तर मृतसंधारणाबरोबर पाण्याचे बाष्पीभवनही कमी प्रमाणात होईल.
पीकरचना निश्चित करताना पावसाचे प्रमाण आणि वेळापत्रकही लक्षात घ्यावे. केवळ आर्थिक लाभासाठी शेती केल्यास निसर्गातील संतुलन बिघडून त्यांच्या परिणामाला सामोरे जावे लागते, याची जाणीव राजेंद्र सिंह यांनी करून दिली. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जमिनीत पाणी जिरवून निसर्गाचे संतुलन राखता येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा