नाशिक – राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची भिकाऱ्याबरोबर तुलना करण्यापेक्षा कांद्याचे निर्यातशुल्क हटविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. दरातील घसरण कायम राहिल्यास कांदा उत्पादक कोकाटे यांच्या घरासमोर ठाण मांडतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला.

मंगळवारी शेट्टी यांनी लासलगाव येथे कांदा उत्पादकांची भेट घेऊन चर्चा केली. कांद्याचे भाव सातत्याने कोसळत आहेत. मागील आठवड्यात क्विंटलला तीन हजार रुपयांवर असणारा कांदा आता दोन हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. पुढील काळात अधिक घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापाऱ्यांना यंदा पीक चांगले असल्याची माहिती आहे. कांदा उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत सरकारने पहिल्यांदा २० टक्के निर्यात शुल्क शून्यावर आणण्याची आवश्यकता आहे. निर्यातीला प्रोत्साहन द्यायला हवे. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यापेक्षा केंद्र सरकारने कांद्याचे भाव स्थिर राखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. भाव पडल्यानंतर नाफेडने कांदा खरेदीसाठी उतरायचे आणि ठराविक दलालांचा कांदा खरेदी करायचा हे धंदे सरकारने बंद केले पाहिजे, अशा शब्दांत शेट्टी यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी तातडीने निर्यातशुल्क शून्य करून निर्यातीला प्रोत्साहन द्यायला हवे. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी यासाठी पाठपुरावा न केल्यास त्यांच्या घरासमोर कांदा उत्पादक आंदोलन करतील, असे शेट्टी यांनी सूचित केले.

Story img Loader