महापौरांच्या बंगल्यासमोर फटाके फोडले; पोलीस ठाण्यात तक्रार

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याचा आनंदोत्सव साजरा करणे सत्ताधारी भाजपच्या अंगलट आले आहे. गुरुवारी बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर महापौरांच्या ‘रामायण’ बंगल्यासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केल्याने ही कृती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची भंग करणारी असल्याचा आक्षेप घेत  ‘आम्ही नाशिककर’च्या वतीने महापौर रंजना भानसी यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावून तो पारदर्शक करण्यावर भर देणारे मुंढे यांनी सत्ताधारी भाजपच्या अनियमित कामाला चाप लावला होता. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने ते कामकाज करीत असल्याचा भाजपचा आक्षेप होता. मुंढे यांची बदली व्हावी, म्हणून जंगजंग पछाडणाऱ्या कार्यकर्त्यांना गुरुवारी बदलीचा आदेश आल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्याचा मोह आवरला नाही. महापौरांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यासमोर उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. मात्र, भाजपच्या या आनंदावर ‘आम्ही नाशिककर’च्या तक्रारीने विरजण पडले. या विरोधात समाधान भारतीय, अनिल भडांगे, विनायक येवले आदींनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

महापौर रंजना भानसी आणि त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी दुपारी फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे निवेदनात म्हटले आहे. दिवाळी आणि काही विशिष्ट सणोत्सवात न्यायालयाने फटाके वाजविण्यास रात्री आठ ते १०ची वेळ निश्चित केली आहे. ध्वनी, वायू प्रदूषणाला कारक ठरणारे फटाके इतरवेळी वाजविण्यास प्रतिबंध आहे. गुरुवारी झालेल्या कृतीमुळे सामान्य नागरिकदेखील फटाके फोडण्याच्या कालमर्यादेचे उल्लंघन करू शकतात. यामुळे भविष्यात न्यायालयीन निर्णयाचा अवमान होऊ नये म्हणून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही नाशिककरच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फटाके वाजविल्याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले.

भाजपचा संबंध नाही

तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली ही प्रशासकीय बाब होती. गुरुवारी या संदर्भातील आदेश महापालिकेत प्राप्त झाले, तेव्हा मी ‘रामायण’ बंगल्यात उपस्थित नव्हते. नंतर त्या ठिकाणी आतील दालनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी रामायणसमोरील रस्त्यावर फटाके फुटल्याचा आवाज आला. रस्त्यावरील प्रकार असल्याने पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्याची दखल घेतली नाही. आयुक्तांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या कोणीतरी खोडसाळपणे रस्त्यावर फटाके फोडण्याची कृती केलेली असू शकते. फटाके वाजविण्याच्या प्रकाराशी आपणासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा कोणताही संबंध नाही.

– रंजना भानसी, महापौर

Story img Loader