लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : परप्रांतीय नागरिकांना लक्ष्य करून मराठी भाषेची सक्ती करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मुंबई बदनाम झाली असतानाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी दोन ते तीनवेळा त्यांच्या घरी जाऊन आले आहेत. मित्र म्हणून त्यांनी जायला हरकत नसली, तरी मुख्यमंत्री म्हणून भेटीसाठी असे त्यांच्या घरी जाऊ नये. मी स्वतः एकदाही राज ठाकरे यांच्या घरी गेलेलो नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे त्यांच्या विनोदी शैलीच्या वक्तव्यासाठी ओळखले जातात. भाजपशी अत्यंत जवळचे संबंध असलेले आठवले हे भाजपने राज्यातील महायुती सरकारमध्ये रिपाइंला स्थान न दिल्याने काही दिवसांपासून नाराज आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांचाही त्यांच्यावर त्यासाठी दबाव आहे. त्यामुळे आठवले हे अधूनमधून महायुतीविरोधातील आपला असंतोष व्यक्त करत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी महायुतीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीवळे केलेली जवळीकही आठवले यांना आवडली नव्हती. मनसेला महायुतीत स्थान देण्यासही त्यांचा विरोध आहे. आमचा पक्ष महायुतीत असताना मनसेची काय गरज, असा प्रश्न त्यांनी याआधीही केला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या जळगाव जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यासाठी मंगळवारी जळगाव दौऱ्यावर असताना मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या सतत बदलत राहणाऱ्या भूमिकेवर टीका केली. मराठीच्या सक्तीसाठी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेशी आपण सहमत नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, मुंबईने अनेक भाषिकांना रोजगार दिला आहे. मुंबई मराठी भाषिकांची आहेच. मुंबईत राहणाऱ्यांनी मराठी भाषा बोलली पाहिजे, हे ठीक आहे. परंतु, बँकेत मराठी भाषेचा आग्रह धरणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिकडे लक्ष देणे आवश्यक आहे. राज ठाकरे मुंबईची बदनामी करत आहेत, अशीही टीका मंत्री आठवले यांनी केली.
मराठी पाट्यांवर बोलण्यापेक्षा मुंबईच्या विकासावर बोलावे, मुंबईतील झोपडपट्टीतील लोकांना न्याय द्यावा, असा सल्लाही आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला. महाराष्ट्राच्या बाहेर राहुनही मराठी बोलणारे लोक आहेत. त्यामुळे इथे मराठी बोललेच पाहिजे, अशी दादागिरीची भाषा करणे चुकीचे आहे. राज ठाकरे आमचे मित्र आहेत. त्यांनी आम्हाला लोकसभेत पाठिंबा दिला होता. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. उलट विधानसभा निवडणुकीवेळी ते आमच्याबरोबर नसताना आमच्या जास्त जागा निवडून आल्या, असा टोला आठवले यांनी हाणला.
राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे सध्या तरी शेतकरी कर्जमाफी होणार नाही. टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल. सरकारने आश्वासन दिलेले आहे आणि ते आश्वासन पाळण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल, अशी मला अपेक्षा आहे, असेही आठवले यांनी सांगितले.