नाशिक : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा संबंध नसला तरी यातील आरोपी वाल्मीक कराड त्यांच्या जवळचा आहे. त्यामुळे नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

पंचवटीतील श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त आठवले यांनी रविवारी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संतोष देशमुख प्रकरणात वारंवार मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर विचार करणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला. जळगाव जिल्ह्यातील यात्रोत्सवात केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्याची बाब अतिशय गंभीर आहे. पुण्यातील घटनाही गंभीर असून त्या प्रकरणात संशयिताला पकडण्यात आले आहे. अशा प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी समाज बांधवांनी, गावागावांनी एकत्र काम केले पाहिजे. कायदे अस्तित्वात असले तरी कायदा मोडणारे असंख्य आहेत. पोलिसांनी सक्रिय राहणे महत्वाचे आहे. विरोधकांनी यात राजकारण करण्याची गरज नाही, असे आठवले यांनी सूचित केले.

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या दुहेरी भूमिकेवर आठवले यांनी बोट ठेवले. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. एकिकडे आमदार धस नाशिकमध्ये येऊन आंदोलकांना पोलिसांना माफ करा, असे सांगतात. दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करतात. अशी भूमिका घेणे योग्य नसून सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांना बडतर्फ करायला हवे, असे आठवले यांनी सांगितले. लव्ह जिहाद कायद्याला आमचा पाठिंबा नाही. दोन जण एकमेकांच्या स्वभावामुळे एकत्र आल्यास त्यास लव्ह जिहाद म्हणणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader