नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचे नियोजन प्रगतीपथावर असताना शहरातील सीतागुंफा ते रामकुंड परिसरादरम्यानच्या १.३६ किलोमीटर मार्गावर रामकाल पथ विकसित करण्याच्या प्रकल्पाने या कामांची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला ६५ कोटींचा निधीही प्राप्त झाला आहे.
मुंबईतील मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी रामकाल पथ प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण आणि चांगले कसे होईल, याकडे लक्ष देण्याची सूचना केली. या प्रकल्पासाठी प्राप्त झालेला निधी मार्च २०२६ पूर्वी खर्च करायचा असल्याने त्यास गती दिली जाणार आहे. वनवास काळात पंचवटीत श्रीराम आणि सीता यांचे वास्तव्य होते. या संकल्पनेवर आधारीत प्रकल्पात राम युगासारखे वातावरण निर्मितीवर भर दिला जाईल. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रेक्षणीय पर्यटनस्थळांचा जागतिक स्तरावर विकास योजनेंतर्गत रामकाल पथच्या १०० कोटींच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. यातील ६५ कोटींचा निधीही महापालिकेस मिळाला आहे.
हेही वाचा >>>मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात संचारबंदी
प्रारंभी महापालिकेने प्राथमिक प्रस्ताव पाठवला होता. आता रामकाल पथ प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे. सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांतर्गत सीतागुंफा ते रामकुंड परिसरादरम्यान क्षेत्रात विविध कामे केली जातील. त्यामध्ये रामायणातील विविध प्रसंग, भित्तीचित्रे, पुतळे, कमानी, दीपस्तंभ, आकर्षक विद्युत रोषणाई, परिसराच्या सुशोभिककरणातून वातावरण निर्मिती केली जाईल. तसेच रामकुंड येथे भाविकांना स्नानासाठी शुध्द पाण्याची व्यवस्था, रामसेतू पुलाचे मजबुतीकरण, भाविकांसाठी प्रसाधनगृह, आदी पायाभूत सुविधांचा अंतर्भाव केला जाणार आहे.
हेही वाचा >>>लाचप्रकरणी महसूल सहायकासह पोलीस अधिकारी जाळ्यात
सिंहस्थाचे पहिले काम
रामकाल पथ प्रकल्पाचा सविस्तर आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे. १०० कोटींच्या या प्रकल्पातील ६५ कोटींचा निधी महापालिकेकडे प्राप्त झाला आहे. मार्च २०२६ पूर्वी हा निधी खर्च करायचा असून या प्रकल्पास गती दिली जाईल. रामकाल पथ सिंहस्थ कुंभमेळ्यातील एक भाग आहे. कुंभमेळ्यातील हे पहिले काम महापालिका हाती घेत आहे. – मनिषा खत्री (आयुक्त, नाशिक महानगरपालिका)