नाशिक : शहरातील वेगवेगळ्या भागात रंगपंचमी जल्लोषात साजरी होत असताना चोरट्यांनीही त्यात रंग भरला. संगीताच्या तालावर थिरकणाऱ्या महिलेच्या मंगळसूत्रासह वाहनतळात उभ्या केलेल्या दुचाकीच्या डिकीतून ११ भ्रमणध्वनी चोरण्यात आले. जेलरोड येथील दिव्या सोनार (हनुमंत लोखडे मळा) या रंगपंचमीनिमित्त बुधवारी गोदाघाटावर गेल्या होत्या. रामकुंड परिसरात डुबकी मारत असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र लंपास केले. याबाबत सोनार यांनी तक्रार दिली. याच भागातील वाहनतळावर वाहने उभी करून रंगपंचमी साजरी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांची वाहने चोरट्यांची लक्ष्य ठरली. दुचाकीच्या डिकी फोडून भ्रमणध्वनीसह डिकीतील ऐवज चोरून नेला. एकूण ११ जणांचे भ्रमणध्वनी लंपास झाले. याबाबत परशराम भोये (रा.भगूर) या युवकाने तक्रार दिली. त्यावरून पंचवटी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वेगवेगळ्या अपघातात तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू
शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पहिला अपघात टाकळी-मिरची चौक रस्त्यावर झाला.आगरटाकळी येथील आयुष तांदळे (१५, शंकर काठे मळा,गांधीनगर) हा मुलगा दुचाकीने प्रवास करत होता. इच्छामणी सर्व्हिस स्टेशन भागात मालवाहू वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने तो रस्त्यावर पडला. पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या मालवाहू वाहनाने त्यास धडक दिली. अपघातात आयुष गंभीर जखमी झाला. काका पांडूरंग तांदळे यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. दुसरा अपघात याच भागातील गोदावरी लॉन्स परिसरात झाला. या अपघातात साहिल बाविस्कर (१५, समतानगर, आगरटाकळी) याचा मृत्यू झाला. साहिल मंगळवारी सायंकाळी जत्रा हॉटेलकडून टाकळी गावाच्या दिशेने दुचाकीवर निघाला होता. टाकळीत मोटारीने दुचाकीस धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याला वडील प्रमोद बाविस्कर यांनी आडगाव वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. तिसरा अपघात नाशिक-पुणे रस्त्यावरील म्हसोबा मंदिर भागात झाला. यात गणेश मथ्थू (३०, इंदिरानगर, लहवित) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गणेश मथ्थू हे बुधवारी सायंकाळी नाशिकहून नाशिकरोडच्या दिशेने दुचाकीवर प्रवास करत होते. मालमोटारीने दुचाकीस धडक दिल्याने मथ्थू हे गंभीर जखमी झाले. कुटूंबियांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तिन्ही घटनांप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या स्वतंत्र नोंदी करण्यात आल्या आहेत.
घरफोडीचे सत्र कायम
शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास केला. पहिली घटना पंचवटीतील शर्मा मळा भागात घडली. याबाबत कैलास भालेराव यांनी तक्रार दिली. भालेराव कुटूंबिय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली ५० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे एक लाख ३७ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना सिन्नर फाटा भागात घडली. याबाबत इमरान रहेमान खान (४४, श्रीपूजा अपार्टमेंट, सिन्नरफाटा) यांनी तक्रार दिली. खान कुटूंबिय सोमवारी दुपारी काही कामानिमित्त घराबाहेर गेले होेते. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून ३३ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ९९ हजार ५७८ रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलवारी, कोयताधारी जेरबंद
शहरातील वेगवेगळ्या भागात तलवारीसह कोयते बाळगणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रंगपंचमीच्या दिवशी कृष्णा फुलमाळी (३२, मल्हारखान झोपडपट्टी) हा युवक शालिमार भागात कोयता बाळगताना आढळला. याबाबत अंमलदार धनंजय हासे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई पाथर्डी फाटा परिसरातील प्रशांतनगर भागात करण्यात आली. सोमवारी रात्री इंदिरानगर पोलिसांनी सागर जाधव (२९, प्रशांतनगर) याची अंगझडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे तलवार आढळली. संशयितास ताब्यात घेऊन पथकाने तलवार जप्त केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी कारवाई कामगारनगर येथे करण्यात आली. विशाल साबळे (१९, सोमेश्वर कॉलनी, मीनाताई ठाकरे गार्डनजवळ,सातपूर) याच्या रिक्षात कोयता आढळला. संशयितास अटक करुन पथकाने रिक्षासह कोयता असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्र्यंबक रस्त्यावरील ईएसआय रुग्णालय भागात केलेल्या कारवाईत ताजीम सल्लाउद्दीन अन्सारी (१९, स्वामी विवेकानंदनगर,अशोकनगर) या कोयताधारी संशयिताला ताब्यात घेण्यात आले. याबाबत अंमलदार सागर गुंजाळ यांनी तक्रार दिली. या दोन्ही कारवाईंबाबत सातपूर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.