प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बिटको रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याचा फटका इतर रुग्ण व तपासणीसाठी आलेल्यांना सहन करावा लागला.जेलरोड येथील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या राणी संदीप लाखे (२२) प्रसुतीसाठी मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल झाल्या. नातेवाईकांनी त्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. ही घटना नातेवाईकांना समजल्यानंतर ते बिटको रुग्णालयात जमा होऊ लागले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांनी धुडगूस घालण्यास सुरूवात केली. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, आपत्कालीन कक्ष व इतर विभागांमध्ये शिरून तावदाने फोडण्यात आली.तसेच बाह्य़ रुग्ण विभागात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांनाही संतप्त जमावाने मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. मारहाणीत दोन महिला जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती समजल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

Story img Loader