नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत येथे होणाऱ्या नाशिक विभागीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीतून भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दूर ठेवले जाणार आहे. खडसे हे भाजपचे पदाधिकारी नसल्याने बैठकीत अपेक्षित नसल्याचे स्पष्ट करतानाच खडसे यांच्या पक्ष प्रवेशाविषयीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील, असे माजीमंत्री रावसाहेब दानवे यांनी सूचित केले आहे.
विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाली असताना भाजपकडून नियोजनाची सूत्रे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हाती घेतली आहेत. त्या अनुषंगाने ते राज्याच्या दौऱ्यावर येत असून बुधवारी नाशिकमध्ये पाच जिल्ह्यातील तयारीचा आढावा त्यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल डेमोक्रसी येथे ही बैठक होईल. या बैठकीचे नियोजन व तयारीसाठी माजीमंत्री दानवे हे शनिवारी शहरात आले होते. यावेळी त्यांनी शाह यांच्या दौऱ्याची माहिती दिली.
हे ही वाचा…Dhule Crime News: प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला! जिल्ह्यात निर्माण झाला तणाव, पोलीस म्हणाले…
मंगळवारी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरचा दौरा झाल्यानंतर बुधवारी ते नाशिकमध्ये बैठक घेतील. बैठकीस नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या प्रत्येक जिल्ह्यांतून प्रत्येकी ६५० पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. यात एकनाथ खडसे नसतील, असे दानवे यांनी नमूद केले. बैठकीस जे पदाधिकारी आहेत, त्यांना बोलविण्यात आले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनाही या बैठकीस निमंत्रित केेले जाणार नसल्याची पुष्टी त्यांनी जोडली.
हे ही वाचा…नाशिकचा कालिकादेवी यात्रोत्सव यंदाही कोजागिरीपर्यंत
मराठा आरक्षणाबाबत भाजपने याआधीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होेते. आम्ही दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. परंतु, सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या सरकारला ते टिकवता आले नाही. मनोज जरांगे यांच्या ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीविषयी विरोधक आपली भूमिका स्पष्ट करीत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.