निश्चलनीकरणाचा निर्णय देशहितासाठी घेण्यात आला असून सर्वसामान्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. असे असताना त्याविरोधात प्रतिक्रिया देणाऱ्या मित्रपक्षाचा विषय आम्ही गांभिर्याने घेत नाही. त्यांचा तोल बिघडला आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली आहे.
जिल्ह्य़ातील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी येथे आलेल्या दानवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत निश्चलनीकरणाच्या निर्णयास जनतेचे समर्थन असल्याचा पुनरुच्चार केला. निश्चलनीकरणामुळे जिल्हा सहकारी बँकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन अलीकडेच शिवसेनेने योग्य उपाययोजना न झाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात दानवे यांनी आजपर्यंत सरकारने जे जे निर्णय घेतले त्या सर्वाविषयी आमच्या मित्रपक्षाने प्रतिक्रिया दिली असल्याचे निदर्शनास आणून दिले. निश्चलनीकरणाविषयी विरोधी प्रतिक्रिया नोंदविल्यावर राजनाथ सिंह यांनी चर्चा केल्यानंतर मित्रपक्षाच्या भूमिकेत बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात तीन टप्प्यांत होणाऱ्या पालिका निवडणुकींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण प्रत्येकी ५५ याप्रमाणे ११० जाहीर सभा घेणार आहोत. त्याशिवाय विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार ही नेतेमंडळीही सभा घेणार आहेत.
निवडणूक प्रचारानिमित्ताने खामगाव येथे मुख्यमंत्री आणि आपली गाठ पडल्यावर झालेल्या चर्चेतून पालिका निवडणुकीत भाजप हा क्रमांक एकचा पक्ष राहील हे लक्षात आल्याचे दानवे यांनी सांगितले. निश्चलनीकरणाचा पालिका निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसून नाशिक जिल्ह्य़ातील सहाही पालिका भाजप जिंकेल, असा दावाही त्यांनी केला. पालिका निवडणुकीत शक्य असेल त्या ठिकाणी मित्रपक्ष किंवा इतर आघाडय़ांशी युती करून अथवा स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचे स्वातंत्र्य स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.