सुवर्ण त्रिकोणात अग्रस्थानी राहावे, यासाठी साकारणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि विकास कामांच्या नावाखाली चाललेल्या कामांमुळे शहराची ही ओळख पुसली जात आहे. विविध कारणांमुळे पक्ष्यांना एक तर स्थलांतर करावे लागते वा अन्य पर्याय धुंडाळावे लागतात. भविष्यातील दुष्परिणामांचे हे संकेत असल्याची बाब नेचर क्लब ऑफ नाशिकच्या पक्षिगणनेत पुढे आली.
नेचर क्लब ऑफ नाशिकने १५ दिवसांपासून शहर परिसरातील धरण, तलाव, जलाशयाची काठी ठिकाणे, रामकुंड, गोदा उद्यान, घारपुरे घाट, केटीएचएम महाविद्यालय, आनंदवली, गंगापूर धरण, तपोवन, बगीचे, वस्त्या आदी परिसरात पक्षिगणना सुरू केली आहे. जेणेकरून नाशिककरांना पक्ष्यांची ओळख व्हावी, पक्ष्यांची आजची स्थिती, प्रदूषणाचा पक्ष्यांवर होणारा परिणाम, बदलती पक्ष्यांची घरटी, नायलॉन मांज्याचा परिणाम आदी विषयांवर अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. नाशिकमधून पक्षी स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. त्यामागे प्रामुख्याने वाडा संस्कृती नष्ट होऊन सिमेंटची जंगले वाढणे, महामार्गाच्या विस्तारीकरणात शेकडो वर्षांपूर्वीच्या वृक्षांची तोड, कुंभमेळ्याच्या नावाखाली गोदाकाठाचे सपाटीकरण करीत झालेली घाटबांधणी ही कारणे असल्याचा अंदाज आहे.
एका दिवसात गवताळ आणि पानथळ भागात राहणाऱ्या ५० जातीच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. स्मशानभूमी परिसरात २५ जातीचे पक्षी दिसले. तसेच याच परिसरात आठ ते दहा प्रकारचे पान पक्षी पाहावयास मिळाले. या मोहिमेत गवताळ प्रदेशातील पन्नास जातीचे तर पाण्यात राहणाऱ्या १५ जातीच्या पक्ष्यांची नोंद केली. पक्ष्यांच्या विविध प्रजाती दिसत असल्या तरी परिस्थिती सुखावह नाही. काही वर्षांपूर्वी संत गाडगे महाराज धर्मशाळा परिसरात बगळ्यांची वस्ती होती. त्या ठिकाणाहून बगळे स्थलांतर करून अमरधाम परिसरात राहत असल्याचे दिसून आले.
शहरात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे घार आणि शराटी या पक्ष्यांनी उंच झाडांचा आश्रय घेण्याऐवजी ते आता मनोऱ्यांचा आधार घेऊन घरटी बनवत आहे. सर्वेक्षणात शहरातील बहुतांश झाडांवर नायलॉन मांजा लटकलेला दिसून आला. गोदापार्क परिसरात एक कावळा आणि वटवाघूळ मांज्यात अडकून मरण पावले. महापालिकेने झाडे व वीज वाहिन्यांवर लटकलेला मांजा काढण्याची गरज पक्षी मित्रांनी व्यक्त केली. नाशिकमध्ये २४ तास वीजपुरवठा असल्याने रात्रीच्या वेळी गोदाकाठ प्रकाशमान राहतो. त्याचा परिणाम पक्ष्यांच्या विश्रांतीवर झाला असून ते स्थलांतरित होत आहे. मात्र यामुळे त्यांचे ‘बायोलॉजिकल’ घडय़ाळ बिघडत असून ते पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. कबुतरांनी आता नवीन इमारतींचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. गोदापात्रातील प्रदूषणाची पातळी वाढली आहे हे सांगणारा स्पॉण्ड हेरॉन पक्षी मोठय़ा प्रमाणात दिसत असून शुद्ध जलाशयातील किंग फिशर मात्र गायब झाला आहे. एस.टी महामंडळ कार्यालय परिसरातील घारींची संख्या १५० वरून ५० वर आली आहे. १०० घारी गेल्या कुठे, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. फटाक्याच्या आतषबाजीने पक्ष्यांच्या कर्णपटलावर परिणाम होत असून त्यांचा चिवचिवाट वाढला आहे. अशा अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, पक्षिमित्र उमेश नागरे, भीमराव राजोळे, आशीष बनकर आदी पक्षिप्रेमी सहभागी झाले.