नाशिक : शहरातील राष्ट्र सेवा दलाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि रचना विद्यालयाच्या माजी उपमुख्याध्यापिका रोहिणी रमेश बलंग (७९) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात सचिन आणि श्रीरंग हे दोन मुलगे, सून व नातवंडे असा परिवार आहे.

महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या रचना विद्यालयात बलंग यांनी प्रदीर्घ काळ अध्यापनाचे काम केले. विद्यार्थीप्रिय व प्रयोगशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख होती.अनेक पिढ्या त्यांनी घडविल्या. राष्ट्र सेवा दलाचा साने गुरुजी कथामाला उपक्रम शहरात रुजविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. विविध शाळांमध्ये ‘श्यामची आई’ पुस्तकातील कथा गोष्टी रुपाने मांडून त्यांनी साने गुरुजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. विद्यार्थ्यांसाठी राष्ट्र सेवा दलाचे राज्यव्यापी शिबीर नाशिकमध्ये आयोजित केले होते. बाल शिक्षण परिषदेच्या कामात त्यांचे मोठे योगदान होते. जिल्ह्यातील मुख्य समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. रचना बालवाडी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यावतीने नाशिकमध्ये राज्यव्यापी बाल शिक्षण परिषदेच्या आयोजनात त्यांची महत्वाची भूमिका राहिली. नाविन्यपूर्ण, आनंददायी पद्धतीेने शिक्षण देण्यासाठी बलंग यांनी राबविलेले प्रयोग इतर शिक्षकांना मार्गदर्शक ठरले. रचना विद्यालयाच्या गुणात्मक विकासात त्यांचे योगदान होते. महाराष्ट्र समाज सेवा संघासह राष्ट्र सेवा दलात त्यांनी शांताताई लिमये, कुसुमताई पटवर्धन यांच्यासारख्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर काम केले.

बलंग यांच्या निधनाचे वृत्त समजताच संघाचे पदाधिकारी, शिक्षक व माजी विद्यार्थ्यांंनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Story img Loader