जळगाव – जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पोलिसांकडूनच झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा-महानगर शाखेतर्फे शनिवारी दुपारी निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पक्षाचे युवानेते आमदार रोहित पवार हेही सहभागी झाले होते.

शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोरील महामार्गावर राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या विविध आघाड्यांसह सामाजिक क्षेत्रातील विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा >>>जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आंदोलन

आमदार पवार म्हणाले की, शांततेने चर्चा करून मार्ग काढता आला असता. मात्र, तुम्हाला आवाज दाबायचा होता. आंदोलकांनी दगडफेक केली, त्यानंतरच पोलिसांनी लाठीमार केला, असा फडणवीस यांचा दावा चुकीचा आहे. आंदोलकावर केलेला लाठीमार माणुसकीला काळिमा फासणारा आहे. मनोज जरांगे परिवारही भयग्रस्त आहे. अगोदर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी महिलांनाही सोडले नाही. आपल्या आईवर जर लागत असेल तर मुलगा कसा गप्प बसेल? त्यानंतर दगडफेक झाली असेल. मात्र, वातानुकूलित कक्षात बसून देवेंद्र फडणवीस यांनी बोलू नये, तर या लाठीमाराची जबाबदारी घेऊन त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा >>>Jalna Lathi Charge: जालन्यात लाठीमाराचा आदेश कोणी दिला; रोहित पवार यांचा प्रश्न

दरम्यान, आंदोलनामुळे महामार्ग ठप्प झाला होता. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील जिल्हापेठ, शहर, शनिपेठ, एमआयडीसी, रामानंदनगर या पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात होता. शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागली.

मुस्लीम मणियार बिरादरीतर्फे निषेध

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात शुक्रवारी पोलिसांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणार्‍या आंदोलकांवर लाठीमार केला. एवढेच नव्हे; तर गोळीबार केला. त्या कृत्याचा जळगाव जिल्हा मुस्लीम मणियार बिरादरीतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे पोलीस महासंचालकांना ई-मेलद्वारे पाठवून भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Story img Loader